...................
प्रलंबित मानधन देण्याची मागणी
वाशिम : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत कामकाज केलेल्या शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत मानधन मिळालेले नाही. हे मानधन देण्यात यावे, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
............
भूखंडाची खरेदी प्रक्रिया अद्याप ठप्पच
वाशिम : राज्याच्या इतर जिल्ह्यात भूखंडाची शासकीय खरेदी-विक्री सुरू असताना वाशिम जिल्ह्यात मात्र ती बंद आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी मनीष मोरे यांनी सोमवारी केली.
..................
मालेगाव तालुक्यात तीनजण बाधित
मालेगाव : सोमवारी प्राप्त अहवालानुसार मालेगाव शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तालुक्यातील हनवतखेडा, मुंगळा आणि किन्हीराजा या गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
................
कोविड रुग्णालयांतील बेड रिक्त
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत परिणामकारक घट झालेली आहे. यामुळे खासगी कोविड रुग्णालयांमधील बेडही रिक्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
......................
पूसद नाका येथे वाहतूक ठप्प
वाशिम : शहरातील पूसद नाका येथे चाैफुली असून, चारही दिशेने वाहने सुसाट वेगाने धावतात. दरम्यान, सोमवारी दुपारी याठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.
..............
जनुना-चाैसाळा रस्त्याची दुरवस्था
वाशिम : मानोरा तालुक्यातील जनुना ते चौसाळा हा आठ किलोमीटर अंतराचा रस्ता वर्षभरापूर्वी तयार करण्यात आला; परंतु रस्त्याची आता चाळण झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे.
.............
जलकुंभ भरण्यास विलंब; ग्रामस्थ त्रस्त
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे जिल्हा परिषद गटात पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने जलकुंभ भरण्यास विलंब लागतो. यामुळे पाण्यासाठी ताटकळत राहावे लागत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
..............
धानोरा-कुंभी रस्त्याची दुरवस्था
वाशिम : मंगरूळपीर ते अनसिंग या मुख्य मार्गादरम्यान धानोरा ते कुंभीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे एखादवेळी अपघात घडण्याची भीती आहे. हा प्रश्न संबंधित यंत्रणेने निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.
....................
एसटीच्या फेऱ्या सुरू, प्रवाशांची सोय
वाशिम : मध्यंतरी कोरोनामुळे बंद असलेल्या एसटीच्या फेऱ्या आता पूर्ववत झाल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय झाली आहे. दरम्यान, प्रवाशांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन येथील आगारप्रमुख विनोद इलामे यांनी केले आहे.
...............
पेरणीची घाई न करण्याचे आवाहन
वाशिम : अद्यापपर्यंत पावसाळ्याला सुरुवातच झालेली नाही. समाधानकारक पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले.