-------
६० शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
वाशिम : कारंजा तालुक्यातील धनज बु., आंबोडा, हिंगणवाडी आणि राहाटी परिसरातील नदीकाठी शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या ५० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील शेती पावसाने खरडून गेली होती. या नुकसानीचे महसूल प्रशासनाने सर्वेक्षणही केले; परंतु सात महिने उलटूनही यातील ६० शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही.
-----
नदीपात्रातील गाळाचा उपसा
साखरडोह : मानोरा तालुक्यातील साखरडोह परिसरात अरुणावती नदीवर बंधाऱ्याचे काम करण्यात येत आहे. पावसाळ्यात थांबलेले हे काम पुन्हा सुरू झाले असून, या कामात अडथळा येत असल्याने नदीपात्रातील गाळाचा उपसा संबंधित यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
----------
२५ वाहनांवर कारवाई
वाशिम : शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचा प्रकार वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या २५ वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखा आणि वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने रविवारी दंडात्मक कारवाई केली. वाशिम शहरात अनेकजण वाहतूक नियम पाळत नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
------
परिचारिका, आरोग्यसेवकांची पदे रिक्त
वाशिम : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये मिळून ७० परिचारिका व ४० आरोग्य सेवकांची पदे गत वर्षभरापासून रिक्त असल्याने कामकाजात व्यत्यय निर्माण होत असून, उपलब्ध मनुष्यबळानुसार ग्रामीण भागात आरोग्यवर्धिनी केंद्र, आरोग्य उपकेंद्रात रुग्णसेवेचे काम करण्याची कसरत आरोग्य विभागाला करावी लागत आहेत.