उद्घाटनपर भाषणात संबोधताना डॉ. आर.एल. काळे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व व जमिनीत होणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण याबद्दल आपले मत मांडून कृषी विज्ञान केंद्राच्या माती परीक्षण प्रयोगशाळेचा लाभ घेऊन माती परीक्षणाच्या आधारे शिफारशीनुसार खतांचा वापर करून खर्चात बचत करून उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन केले. सुभाष खरात यांनी माती परीक्षणाच्या आधारावर खत मात्रा ठरवावी व गरजे इतकाच रासायनिक खतांचा वापर करावा, असे सांगत शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांचा वापर सेंद्रिय पदार्थांसोबत करावा तसेच पिकांचे अवशेष व हिरवळीच्या खतांचा वापर करावा, असे आवाहन केले. कृषी विभाग वाशिमचे मिलिंद कांबळे यांनी मातीचा नमुना घेण्याची शास्त्रोक्त पद्धत, जमिनीचा सामू व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता यांचा परस्पर संबंध याबाबत सविस्तर माहिती दिली. कृषी विद्या शाखेचे प्रमुख प्रा. टी. एस. देशमुख यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या संकल्पनेअंतर्गत रासायनिक खते, जैविक संवर्धक वापर, शेणखत कंपोस्ट खत निर्मिती व माती परीक्षण सूक्ष्म अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माती परीक्षण प्रयोगशाळेचे प्रमुख एस. के. देशमुख यांनी तर आभार एस.आर.बावस्कर यांनी मानले.
-----