महाराष्ट्रात १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यात विविध कृषीविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी २१ जूनपासून कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम १ जुलैपर्यंत चालणार आहे. या उपक्रमांतर्गत शेतकरी मेळावे, शिवारफेऱ्या, गावबैठका, शेतीशाळा, प्रशिक्षणे, परिसंवाद, कार्यशाळा, पीक प्रात्यक्षिके यांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यालयीन दिवशी महत्त्वाचे तंत्रज्ञान व मोहिमांवर विशेष भर देऊन प्रचार, प्रसार व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार यांनी कळविले आहे. काजळेश्वर येथे या मोहिमेंतर्गत घेण्यात आलेल्या सभेत शेतकऱ्यांना बीबीएफ तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी केल्यामुळे कमी पाऊस अथवा पावसात खंड पडल्यास सरीतील ओलाव्यामुळे पीक अधिक काळ तग धरून ठेवते तर जास्त पाऊस झाल्यास सरीतून निघून जाते. त्यामुळे दोन्ही परिस्थिती शेतकऱ्यांचे नुकसान न होता फायदाच होतो, असे याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी संतोष चौधरी यांनी सांगितले. तसेच बीबीएफ पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाला सरपंच वर्षाबाई अंबाळकर, प्रगतिशील शेतकरी अरविंद लाहे, प्रवीण लाहे, सुरेश लाहे, शरद लाहे, विजय लाहे, अतुल लाहे, राजेश आडे यांच्यासह अनेक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक कृषी सहायक नरेंद्र फुके यांनी केले.
कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत भडशिवणी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:26 AM