रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांची कसरत
वाशिम : हिंगोली मार्गावर निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या रस्त्याची अवस्था वाईट झाली आहे. यावर मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून गटारे झाली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहने चालविताना चालकांची मोठी कसरत होत असल्याचे चित्र दरदिवशी पाहायला मिळत आहे. एखाद वेळी या ठिकाणी अपघात घडण्याची भीती आहे.
साेयाबीनवर कीड; शेतकरी चिंतेत
वाशिम: जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. व्हायरस, मिली बग आदी रोगांसह आता पाने खाणाऱ्या अळीने या पिकावर आक्रमण केले आहे. त्यामुळे सोयाबीनच्या पानांची अक्षरश: चाळणी होत असल्याने उत्पादन घटण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत. चांगले असलेले हातचे पीक जाते की काय या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहेे. कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून केली जात आहे.
वाशिम येथे मतदार जनजागृती
वाशिम: वाशिमच्या श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये साक्षरता दिनानिमित्त ८ सप्टेंबर रोजी ‘मतदार जनजागृती ’ या विषयावर चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती केली. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अरुणराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यात आली.
एकरी ५० हजार अनुदानाची मागणी
वाशिम: टोमॅटोचे दर कमी झाल्याने वाशिमसह राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना एकरी किमान ५० हजार रुपयांचे अनुदान द्या, अन्यथा शासकीय कार्यालयात टोमॅटो फेको आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.