-------------
उंद्री प्रकल्पांतर्गत कालव्याद्वारे सिंचन
धनज बु.: उंद्री येथील प्रकल्पावर बांबर्डा कानकिरड आणि कामरगावसह परिसरातील २७६ हेक्टर क्षेत्रातील शेतीचे सिंचन अवलंबून आहे. त्यासाठी रबी हंगामात या प्रकल्पाच्या कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी सोडले जाते. गत पावसाळ्यात हा प्रकल्प १०० टक्के भरल्याने परिसरातील सर्व शेतकऱ्यांना कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.
--------------
इंझोरीत ग्रामस्थांना मार्गदर्शन
इंझोरी: मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे विषाणू संसर्ग पसरू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासन विशेष दखल घेत असून, गेल्या आठवडाभरापासून गावात कोरोना नियंत्रणासह हिवाळ्याच्या दिवसात होणाऱ्या संभाव्य आजारांबाबत गावात जनजागृती करण्यात येत आहे. यात शुक्रवारी ग्रामस्थांना आरोग्य विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले.
--------------
तलाठ्याचे पद पाच महिन्यापासून रिक्त
इंझोरी: मानोरा तालुक्यातील इंझोरी साजातील तलाठ्याचे पद गेल्या पाच महिन्यापासून रिक्त आहे. येथील प्रभार इतर ठिकाणच्या तलठ्याकडे दिला आहे. त्यामुळे ते नियमित गावात येत नसल्याने शेतकरी, ग्रामस्थांची कामे खोळंबत आहेत. याची दखल घेऊन महसूल प्रशासनाने येथील तलाठ्यांचे पद तात्काळ भरावे, अशी मागणी पोलीस पाटील नंदकिशोर तोतला यांनी शुक्रवारी केली.
-------
आयुर्वेदिक दवाखाना इमारत शिकस्त
धनज बु.: कारंजा तालुक्यातील धनज बु. अंतर्गत येत असलेल्या राहाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्याची दोन वर्षांपासून इमारत शिकस्त झाली आहे. तथापि, या इमारतीच्या दुरुस्तीची दखल घेण्यात आली नाही. शिवाय परिसरात मोठ्या प्रमाणात घाण, कचरा पसरला आहे. त्याची दखल घेण्याची मागणी राहाटी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
------
देपुळात १२५ एकरवर बीजोत्पादन
देपूळ: वाशिम तालुक्यातील देपूळ येथील २५ ते ३० शेतकऱ्यांच्या गटाने यंदा महाबीजच्या बीजोत्पादन प्रकल्पांतर्गत १२५ एकर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. यासाठी त्यांना महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांचे आवश्यक मार्गदर्शन लाभले. परिसरातील इतर ठिकाणच्या सोयाबीनच्या तुलनेत देपूळ येथे चांगले झाले आहे.