लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्हाभरात शाश्वत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून आराखडा तयार करण्यासाठी ग्रामस्तरावर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. यात ग्रामस्थांना कुटूंबस्तर स्वच्छता तपासणीसह इतर विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत सर्व ग्रामंपचायती हागणदरी मूक्त करण्यात आल्या असल्या तरी, अद्याप अनेक कुटूंबांनी शौचालय बांधलेले नाही, तसेच अनेक कुटूंबे शौचालय असतानाही त्याचा वापर करीत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्तरावर कुटुंबांनी शौचालयाचा नियमित वापर करणे, शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करणे, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन करणे या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचा शाश्वत स्वच्छता आराखडा तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत घरोघरी भेट देऊन शौचालय नसलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षणही करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कारंजा तालुक्यातील सर्व ग्रा.प.चे आराखडे तयार झाले असून, वाशिम तालुक्यातील जांभरुण परांडे, मालेगाव तालुक्यातील एरंडा ग्रामपंचायतीचा आराखडा तयार करण्यात आला, तर मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी सभा घेऊन स्वच्छता आराखडा निर्मितीबाबत जिल्हा स्वच्छता मिशन कक्षाकडून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) सुदाम इस्कापे, तसेच माहिती व शिक्षण संवाद तज्ज्ञ राम श्रृंगारे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. कुटुंबस्तर स्वच्छता स्थिती तपासणी कशी करावी, पाणी व्यवस्थापन व नियोजन कसे करावे, याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला क्षमता बांधणी तज्ज्ञ प्रफुल काळे, शिक्षक डी. के. गवई, पोलीस पाटील सतिष क्षीरसागर, कोठारीचे उपसरपंच मुरलीधर सातपुते, मंगेश निळकंठ, रामचंद्र घोंगडे, रमेश राऊत, ग्रामसचिव शिंदे, मारोती देवरे, अंबिका लोखंडे, वसंतराव गवई, दत्ता माहुलकार, यांची उपस्थिती होती.
शाश्वत स्वच्छतेबाबत ग्रामस्तरावर मार्गदर्शन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 6:04 PM