फुलकीड ही कांदा पिकाची नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. रब्बी हंगामात कांदा पिकावर या किडीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या अधिक आढळून येते. तीव्र प्रादुर्भाव झाल्यास कांदा पिकाचे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. कोरडी हवा आणि २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान या किडीच्या वाढीसाठी पोषक असते. कांद्यावरील फुलकीड ही पिवळसर तपकिरी रंगाची असून तिच्या शरीरावर फुलीच्या आकाराचे गडद चट्टे असतात. साधारणत: कांद्यावरील फुलकिडे कांद्याच्या पानाचे आवरण व खोड यामध्ये म्हणजेच पातीच्या बेचक्यात लपलेले असतात. या किडीची मादी पानाच्या कोवळ्या उतीमध्ये ५० ते ६० अंडी घालते. या अंड्यांतून निघालेली पिल्ले व प्रौढ कीटक कांद्याची पाने खरडून पानातून येणारा रस शोषण करतात. त्यामुळे कांद्याच्या पानावर पांढरे ठिपके पडतात. कालांतराने कांद्याची पाने तपकिरी बनून वाकडी होतात व वाळतात. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात लक्षणीय घट होऊ शकते. या पार्श्वभूमीवर कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ आर. एस. डवरे यांनी शेतकऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणे सुरू केले. फुलकीड नियंत्रणासाठी कांदा लागवडीपूर्वी साधारणत: पंधरा दिवस अगोदर शेताच्या कडेने मका या पिकाच्या दोन ओळींची लागवड करावी, कांदा पिकाची सतत त्याच त्या शेतात लागवड करणे टाळावे, क्रायसोपासारख्या मित्र किडीचे शेतामध्ये संवर्धन व जतन करावे, साधारणत: आठ ते दहा दिवसांच्या अंतराने वेळोवेळी पाच टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाची कांद्यावरील फुलकिडीच्या प्रतिबंध व व्यवस्थापनाकरिता फवारणी करावी, असे आवाहन आर. एस. डवरे यांनी केले आहे.
-----
व्हॉटसअॅप ग्रुपचा आधार
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने मार्गदर्शन करणे शक्य नाही, तर मोजक्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून फारसा फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ आर. एस. डवरे यांनी वाशिम जिल्हा कृषी विभागाच्या व्हॉटसअॅप ग्रुपचा आधार घेतला आहे.
===Photopath===
140121\14wsm_2_14012021_35.jpg
===Caption===
कांदा पिकावरील किड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन