वाशिम : पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेत जिल्ह्यातील ४३ गावे सहभागी झाली आहेत. यातील निवडक गावांना आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी शुक्रवारी भेटी देऊन सरपंचांना स्पर्धेबाबत मार्गदर्शन केले. त्यात मंगरूपीर तालुक्यातील तपोवन, पारवा तसेच कारंजा लाड तालुक्यातील बेलमंडळ, जानोरी, पोहा, दोनद बु. आणि शिवण या गावांच्या सरपंचांचा समावेश होता.
-------------
काजळेश्वर परिसरात आरोग्य तपासणी
काजळेश्वर : कारंजा तालुक्यात कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागाने ग्रामस्थांची तपासणी सुरू केली आहे. त्यात गेल्या आठवडाभरात आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आरोग्यसेवक, आशासेविका, अंगणवाडी सेविकांनी १३८ लोकांची आरोग्य तपासणी केली.
------------
सेंद्रीय खत निर्मितीबाबत मार्गदर्शन
बांबर्डा कानकिरड : कृषी विभागाकडून पोकरा योजनेत सहभागी गावांत शेतकऱ्यांना कंपोस्ट, नॅडेपसह हिरवळीच्या सेंद्रीय खतनिर्मितीबाबत मार्गदर्शन केले जात असून, तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी शुक्रवारी बांबर्डा कानकिरड परिसरातील गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना या खताच्या निर्मितीबाबत माहिती देताना रासायनिक खतांचा वापर टाळण्याचे आवाहन केले.
-----------------
सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात
आसेगाव: येथून जवळच असलेल्या शेंदुरजना आढाव येथील आप्पास्वामी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रमोद शातलवार, प्राचार्य डॉ. बी. एस. कव्हर, कार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल बोरकर, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. बी. भिसे, डॉ. एस.पी. मनवर उपस्थित होते.
----------
कुत्र्याच्या हल्ल्यात नीलगाईचा मृत्यू
वाशिम: चारापाण्याच्या शोधात शिवारात धाव घेणाऱ्या वन्यप्राण्यांवर कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. आठवडाभरात दोन माकडांचा यात मृत्यू झाला, तर वनोजा येथील प्रादेशिक जंगल परिसरात एका नीलागाईचाही मृत्यू झाला. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाने उपाययोजना करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.