------
वाशिम तालुक्यात तीन नवे बाधित
वाशिम : आरोग्य विभागाकडून सोमवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील आणखी तीन व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यात शहरातील शिव चौक येथील १, नवीन पोलीस वसाहत परिसरातील १, वारा येथील एकाचा समावेश आहे.
---------
शाळांचे निर्जंतुकीकरण
पोहरादेवी : शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारी रोजी सुरू झाल्यानंतर पोहरादेवी परिसरात शाळांचे नियमित निर्जंतुकीकरण केले जात आहे. मंगळवारी पुन्हा परिसरातील शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
-----------
कारंजात आणखी एक बाधित
कारंजा : तालुक्यात दरदिवशी कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात आरोग्य विभागाकडून सोमवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार कारंजा शहरातील आशाताई गावंडे कॉलनी परिसरातील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.
----------
धनज बु. येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
धनज बु.: गेल्या काही दिवसांपासून परिसरात संत्रा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने मृग बहारातील फळे गळत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी शेतकऱ्यांना मंगळवारी मार्गदर्शन केले.
----------
शेतकरी चर्चासत्राचे आयोजन
वाशिम : पुढील खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन सुरू आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे उगवण शक्तीसह घरच्या बियाण्यांवर प्रक्रिया करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत सोमवारी शेतकऱ्यांचे कृषी चर्चासत्र घेण्यात आले.