रिसोड : वाशिम येथील कृषी विज्ञान केंद्रातील गृह शाखेतर्फे ५ मे रोजी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. त्यात आंब्यापासून तयार होणाऱ्या विविध स्वरूपातील टिकाऊ पदार्थांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ व कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे म्हणाले, महिलांनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तथा तंत्रज्ञानाचा वापर करून सक्षम व्हावे. कोरोनाचा काळ संपल्यानंतर प्रशिक्षणार्थींनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर असलेल्या प्रक्रिया युनिटसोबतच कमी खर्चाचे शेती निविष्ठा निर्मिती केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तांत्रिक सत्रात कार्यक्रम सहाय्यक शुभांगी वाटाणे यांनी आंब्याच्या वाढीव उत्पादनावर प्रक्रिया कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. आंबा प्रक्रियेतून मूल्यवर्धन करून रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होऊ शकते, ही बाब पटवून देताना त्यांनी आंब्यापासून जॅम, स्वॅश, बर्फी, आंबा पोळी, आंबा सरबत तसेच आंबा प्रक्रिया उद्योगांसाठी लागणारी यंत्रसामुग्री व उत्पादित मालाच्या विक्रीकरिता लागणारे परवाने आदी बाबींचे सादरीकरण करून मार्गदर्शन केले.
यावेळी सहाय्यक प्राध्यापक डॉ. जयश्री मनोहर, डॉ. मंजुषा कदम यांनी मार्गदर्शन करून कृषी विज्ञान केंद्रासोबत शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय या विषयावर महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांकरिता काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन एस. आर. बावस्कर यांनी केले.