छुप्या पद्धतीने गुटखा विक्री सुरूच
वाशिम : पोलीस प्रशासनाने चालू महिन्यांत गुटखा जप्तीच्या अनेक कारवाया केल्या. पानटपऱ्यांचीही झाडाझडती घेणे सुरू आहे.
सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी
वाशिम : मध्यंतरी ऑक्सिजन सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. तेव्हा त्याचे दरही वाढविण्यात आले होते. आता मात्र गरज कमी झाल्याने पुरेशा प्रमाणात सिलिंडर उपलब्ध असून, दर कमी करण्याची मागणी होत आहे.
मजुरांच्या कामाची देयके प्रलंबित
वाशिम : सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत शेकडो कामगारांना अद्याप मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांना कुशल कामाची देयकेही अद्याप मिळालेली नाहीत. संबंधितांनी याची दखल घेण्याची मागणी होत आहे.
उंबर्ड्यात अनियमित वीजपुरवठा
वाशिम : कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथे आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे भाजीपाला पिकांचे सिंचन प्रभावित होत असल्याने, शेतकरी, तर घरातील पंखे बंद राहत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
बाजारपेठेत गर्दी टाळण्याचे आवाहन
वाशिम : नागरिकांची गैरसोय टळावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दुपारी चार वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली. मात्र, तोपर्यंतच बाजारपेठेत तोबा गर्दी होत आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले.
केनवड परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : केनवड परिसरातील ग्रामीण रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. इतर गावांना जोडणारे रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.