.................
नियंत्रण कार्यालयाचा अभाव; कर्मचारी त्रस्त
वाशिम : राज्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रण कार्यालय नसल्याने कर्मचाऱ्यांना कामासाठी अकोला येथे जावे लागते. यामुळे गैरसोय होत असून, कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
...............
उपबाजारांची अवस्था वाईट
वाशिम : जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समित्यांतर्गत येणाऱ्या पाच उपबाजारांपैकी तीन उपबाजारांची अवस्था वाईट आहे. या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने शेतमाल विक्रीस येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
............
बालविवाहांवर प्रशासनाची नजर
वाशिम : जिल्ह्यात होणाऱ्या बालविवाहांवर प्रशासनाची करडी नजर आहे. त्यानुषंगाने आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी रविवारी दिली.
..............
आययूडीपीमधील नाल्यांची सफाई
वाशिम : शहरातील जुनी आययूडीपी कॉलनी परिसरात घाण पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची दैनंदिन सफाई करण्याकडे नगर परिषद प्रशासनाने विशेष लक्ष पुरविले आहे. यामुळे स्वच्छता राखण्यास मदत होत आहे.
.................
‘विनामास्क’प्रकरणी ३० चालकांवर कारवाई
वाशिम : मालेगाव पोलिसांनी शुक्रवारी कारवाईची मोहीम राबवत तोंडाला मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेतली. नाक, तोंडाऐवजी हनुवटीवर मास्क ठेवल्याप्रकरणी ३० चालकांवर कारवाई करण्यात आली.
..................
शिष्यवृत्तीची रक्कम देण्याची मागणी
वाशिम : जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेच्या रकमा आधार क्रमांक लिंक न केल्याने वा इतर त्रुटीमुळे प्रलंबित आहेत. अडचणी दूर करून शिष्यवृत्ती देण्याची मागणी होत आहे.
...............
बांधकामाच्या विटांचे भाव कडाडले
वाशिम : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुलासह विविध योजनेअंतर्गत घरकुलांची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे विटांची मागणी वाढली असून, दरही कडाडले आहेत.
................
सबलीकरण योजनेला खीळ
वाशिम : जिल्ह्यात समाज कल्याण विभागांतर्गत दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी शेकडो प्रस्ताव सादर केले असतानाही त्यांना मंजुरी मिळत नसल्याने या योजनेला जिल्ह्यात खीळ बसल्याचे दिसत आहे.