शिरपूर जैन ही जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत आणि पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळालेले तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी देशभरातील लाखो भाविक वर्षभरात विविध संस्थानमध्ये दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी जैन धर्मीयांचे देशभरात प्रसिद्ध असलेले भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथांचे मंदिर, जानगीर महाराज संस्थांन, मिर्झा मियॉ बाबांचा प्रसिद्ध दर्गासह इतर धर्मीयांचीही प्रसिद्ध देवस्थाने असल्यानेच येथे वर्षभर भाविकांची रेलचेल असते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमांवर मर्यादा असल्या तरी पुढच्या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे प्रमाण लक्षणीय असणार आहे. ही बाब लक्षात घेता शिरपूर येथील रस्ते, नाल्या सुव्यवस्थित असणे, तसेच गावात स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे; परंतु चित्र अगदी त्या उलट आहे. गावातील बहुतांश भागातील नाल्यांची दुरवस्था झाली असून, नाल्यांवरील रपटेही तुटले आहेत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहून गटारे तयार होत आहेत. गावातील वॉर्ड क्रमांक-६ मधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची दुरवस्था झाल्याने भर रस्त्यावर मोठे गटार साचले आहे. याच गटारातून गावातील लोकांना ये-जा करावी लागते. त्यात अनेक घरांतील नळांना तोट्याही नसल्याने पाणीपुरवठा सुरू झाला की नळाचे पाणी रस्त्यावर वाहू लागते. यावर नियंत्रणाचे प्रयत्न मात्र होत नसल्याने त्याच परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे
कोट : वॉर्ड नं. ६ मध्ये मागील कित्येक वर्षांपासून ही समस्या आहे. स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
- मोहसिन खान ताहिरखान. स्थानिक रहिवासी
कोट: वॉर्ड नंबर ६ ग्रामस्थांची समस्या लक्षात घेता या वॉर्डमधील विविध विकासकामे एका महिन्याच्या आत सुरू करण्यात येतील.
विजय अंभोरे, क्रांती पॅनल संस्थापक सदस्य