संतोष वानखडे, वाशिम : उन्हाळ्यातही वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळवारा व गारपिटीचा मुक्काम वाढला असून, रविवारी (दि. ३०) दुपारच्या सुमारास वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, रिसोड व मालेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामध्ये हळद, बिजवाई कांदा यांसह फळबाग, भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले.
जिल्ह्यात मार्च महिन्यातही गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तसेच गत आठ दिवसांपासून कमी - अधिक प्रमाणात वादळवारा व विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस, गारपीट सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. रविवार, ३० एप्रिल रोजी दुपारी १२:०० वाजताच्या सुमारास मंगरूळपीर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाले. आसेगाव परिसरातील धानोरा ते शेंदुरजना या मार्गावरील भोपळपेंड नदी दुथडी भरून वाहू लागली तसेच मंगरूळपीर ते कारंजा मार्गावरील मडाण नदीदेखील वाहती झाली. मानोरा तालुक्यातील इंझोरी नाल्याला तसेच बेलोरा नाल्यादेखील पूर आला.
अवकाळी पावसामुळे जवळपास ३१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास वाशिम तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. तामशी, अडोळी, सावरगाव जिरे, सायखेडा, राजगाव, तोंडगाव आदी परिसरात बिजवाई कांदा, हळद पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ झाली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"