जिल्ह्यात गतवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील सर्वचे पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. त्यानंतर उपलब्ध जलसाठ्याच्या आधारे रब्बी पिकांचे उत्पन्न घेण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली. विविध संकटातून ही पिके सावरत आता काढणीवर आली असतानाच गुरुवारी सकाळच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो एकरातील गहू आणि हरभरा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा ८८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. त्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची पेरणी झाली असून, ५७ हजारापेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे. काही शेतकऱ्यांनी गहू, हरभऱ्याची काढणी केली असली तरी, निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाचे पीक काढणीच्या अवस्थेत असतानाच अवकाळी पावसाचा या पिकाला फटका बसला. शिवाय ३० टक्के क्षेत्रातील हरभरा पिकही काढणीवर असताना या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
-----------
कारंजा-मानोऱ्यात अधिक नुकसान
जिल्ह्यात गुरुवारी विविध भागांत अवकाळी पाऊस पडला. त्यात कारंजा, मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. तथापि, कारंजा आणि मानोरा तालुक्यातच पिकांना फटका देणारा पाऊस पडल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारंजा तालुक्यात, तर काही ठिकाणी गारपिटही झाल्याची माहिती असून, या पीक नुकसानीची पाहणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-------
कोट: आमच्या शेतात १० एकर क्षेत्रात गहू पिकाची पेरणी केली आहे. हे पीक काढणीवर येत असतानाच गुरुवारी सकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण पीक जमीनदोस्त झाल्याने आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या पीक नुकसानीची पाहणी प्रशासनाने करावी, अशी आमची मागणी आहे.
निशा आसावा,
शेतकरी , इंझोरी
-----------
कोट: लागोपाठच्या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी बेजार झाला आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणाचा फटका बसल्यानंतर आता रब्बी हंगामात चांगले उत्पन्न मिळण्याची आशा होती; परंतु अवकाळी पावसाने पुन्हा घात केला आणि काढणीवर आलेले गहू पीक हातून गेले. प्रशासनाने तातडीने या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.
-नितीन उपाध्ये,
शेतकरी, काजळेश्वर
पीक क्षेत्र (हेक्टर)
हरभरा ५७२०२
गहू २९४०५
करडी ३३१
मका २९६
इतर तेलबिया १४१