- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ४ हजार ७९१ शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. तथापि, खरीप हंगाम निम्म्यावर आला असताना, केवळ ८७,४६१ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात आले असून, ३१ जुलैपर्यंत १७ हजार ३२० शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.वाशिम जिल्ह्यात यंदाच्या आर्थिक वर्षाकरिता खरीप आणि रब्बी हंगाम मिळून १ लाख १२ हजार ९३ शेतकऱ्यांना ११०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यात खरीप हंगामासाठी १ लाख ४ हजार ७९१ शेतकऱ्यांना १ हजार २५ कोटी रुपयांचे, तर रब्बी हंगामासाठी ७ हजार ३०२ शेतकऱ्यांना ७५ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्षात खरीप हंगाम आता निम्म्यावर आला असतानाही ७१४ कोटी ६८ लाख रुपये ८६ हजरी ,८७९ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात आले असून, ३१ जुलैपर्यंत १७ हजार ९१२ शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. पीक कर्ज वितरणात सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्रातील बँकांची उदासीनता असून, या क्षेत्रातील बँकांना ३२ हजार १०९ शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज वितरण करावयाचे असताना, २९ जुलैपर्यंत केवळ १९ हजार ४०० शेतकऱ्यांना १८३ काेटी ८८ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ५६.५८ टक्के आहे.
सहकारी बँकेची पीक कर्ज वितरणात आघाडीजिल्ह्यात सहकारी बँकांना खरीप हंगामासाठी ६२ हजार ९१८ शेतकऱ्यांना ६०५ काेटी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ५९ हजार ८३९ शेतकऱ्यांना ४५२ काेटी २० लाख रुपयांचे पीक कर्ज या बँकेकडून वितरित करण्यात आले असून, हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या ७४.७३ टक्के आहे. अर्थात, दरवर्षी प्रमाणे यंदाही सहकार बँकेने पीक कर्ज वितरणात आघाडी कायम ठेवली आहे.
खासगी, सार्वजनिक बँकांना वावडेजिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील १५ बँका मिळून ३२ हजार १०९ शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज वितरण करावयाचे असताना ३१ जुलैपर्यंत केवळ १९ हजार ९८२ शेतकऱ्यांना १९० काेटी ५४ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित केले आहे. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या केवळ ५८.६३ टक्के आहे. अर्थात, पीक कर्ज वितरणाचे या बँकांना वावडे असल्याचे दिसते.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे अनेकांना शेतीवर केलेला खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे यंदा हजारो शेतकऱ्यांना पेरणीसह इतर खर्चासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे बँकेकडे पीक कर्जाचा प्रस्ताव सादर केला, परंतु खरीप हंगाम निम्मा उलटला, तरी अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी पायपीट करावी लागत आहे.- नितीन पाटील उपाध्ये, शेतकरी.
खरीप हंगामात बियाणे, खते व इतर खर्चांसाठी बँकेकडे पीक कर्जाची मागणी करावी लागते, परंतु यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही दीड ते दोन महिने कर्ज मिळत नाही. खरीप पेरणीची वेळ निघून जात असल्याने, उसणवार करून पेरणी करावी लागते. यंदाही अनेकांना याची प्रचिती आली. शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँका उदासीन आहेत.- घनश्याम ढोक, शेतकरी.