वाशिम : मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे रिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी जागृत पालक विचार मंचच्यावतीने २० डिसेंबर रोजी शाळेसमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले तसेच पंचायत समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन केले.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार, जि.प. माध्यमिक शाळा व कनिष्ठ विज्ञान विद्यालय, मंगरूळपीर येथे वर्ग ५ ते १० वीसाठी ३७ शिक्षकांची आवश्यकता आहे. यापैकी फक्त १६ शिक्षकच कार्यान्वीत आहेत. शिक्षकांची अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने पाल्ये शिक्षण कशी घेतील? असा प्रश्न निर्माण झाला. या गंभीर शैक्षणिक समस्येविषयी जागृत पालक कृति विचारमंचाच्या वतीने ४ डिसेंबर रोजी व त्यानंतर सुद्धा निवेदन दिले होते.
परंतु प्रशासनातर्फे शिक्षक मिळण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नसल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २० डिसेंबर रोजी पंचायत समिती, मंगरूळपीर कार्यालयासमोर पालकांच्यावतीने जिल्हा परिषद शाळेसमोर अर्धनग्न आंदोलन तर पंचायत समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले.