- दादाराव गायकवाडलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाचा पावसाळा अर्ध्यावर आला असून, प्रशासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरीच्या अधिक पाऊसही पडला आहे. तथापि, अद्याप जिल्ह्यातील प्रकल्प तहानलेलेच असून, ८४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. मध्यम प्रकल्पांची स्थिती समाधानकारक असून, त्या ३ प्रकल्पांत ४८.४६ टक्के जलसाठा झाला आहे.जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत तीन मध्यम आणि १३४ लघु प्रकल्प मिळून एकूण १३७ प्रकल्प आहेत. गतवर्षीच्या दमदार पावसामुळे यातील ९५ टक्के प्रकल्प काठोकाठ भरले होते. यंदाही जून महिन्याच्या उत्तरार्धासह जुलैच्या सुरुवातीला पावसाने दिलेला खंड वगळता दमदार पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे आजवरचे पावसाचे प्रमाणही जून, जुलैमधील सरासरीपेक्षा खूप अधिक असून, १ जून ते १५ जुलैदरम्यान पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत यंदा ३० टक्के अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या पातळीत मोठी वाढ अपेक्षित होती. परंतु अद्याप जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत मिळून सरासरी केवळ ३०.४८ टक्के साठा झाला आहे. आता पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीत जोरदार पाऊस न पडल्यास यंदा जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांची पातळी निम्म्यापर्यंतही पोहोचण्याची शक्यता कमीच राहणार आहे.
दोन लघु प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पाच्या आणि कारंजा तालुक्यातील वडगांव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील केवळ हे दोनच प्रकल्प अर्ध्या पावसाळ्यापूर्वीच शंभर टक्के भरले असून, या दोन्ही प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्गही होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. विशेष म्हणजे यंदा कारंजा तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडत आहे.