जिल्ह्यात पाटबंधारे विभागांतर्गत तीन मध्यम आणि १३४ लघु प्रकल्प मिळून एकूण १३७ प्रकल्प आहेत. गतवर्षीच्या दमदार पावसामुळे यातील ९५ टक्के प्रकल्प काठोकाठ भरले होते. यंदाही जून महिन्याच्या उत्तरार्धासह जुलैच्या सुरुवातीला पावसाने दिलेला खंड वगळता दमदार पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे आजवरचे पावसाचे प्रमाणही जून, जुलैमधील सरासरीपेक्षा खूप अधिक असून, १ जून ते १५ जुलैदरम्यान पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत यंदा ३० टक्के अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या पातळीत मोठी वाढ अपेक्षित होती. परंतु अद्याप जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांत मिळून सरासरी केवळ ३०.४८ टक्के साठा झाला आहे. आता पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीत जोरदार पाऊस न पडल्यास यंदा जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांची पातळी निम्म्यापर्यंतही पोहोचण्याची शक्यता कमीच राहणार आहे.
-----------.
पातळी न वाढण्याची कारणे
१) कॅचमेंट एरियात पाऊस कमी
जिल्ह्यात जून ते १५ जुलैदरम्यान अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पाऊस अधिक पडला असला तरी प्रकल्पांच्या कॅचमेंट एरियात अर्थात पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या पातळीत अपेक्षित अशी वाढ होऊ शकली नाही.
---------
२) सार्वत्रिक पावसाचाही अभाव
जिल्ह्यात यंदा जून ते १५ जुलैदरम्यान अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पाऊस अधिक पडल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. परंतु जिल्ह्यात सार्वत्रिक आणि एकसारखा पाऊसच अद्याप पडलेला नाही.
------------------
३) पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत उपसा
जिल्ह्यात सिंचनाखालील क्षेत्र काही प्रमाणात वाढले आहे. त्यात रब्बी पिकांशिवाय भाजीपाला पिकांची लागवडही शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत असून, अगदी पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत प्रकल्पातून उपसा होत असल्याने पातळीवर परिणाम होतो.
--------------
दोन लघु प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’
जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अडोळ प्रकल्पाच्या आणि कारंजा तालुक्यातील वडगांव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील केवळ हे दोनच प्रकल्प अर्ध्या पावसाळ्यापूर्वीच शंभर टक्के भरले असून, या दोन्ही प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्गही होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. विशेष म्हणजे यंदा कारंजा तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडत आहे.
----------------------
दमदार सरासरीनंतरही मंगरुळपीरची स्थिती वाईट
जिल्ह्यात यंदा मंगरुळपीर तालुक्यात पावसाची सरासरी सर्वात चांगली आहे. या तालुक्यात १ जून ते १५ जुलैपर्यंत २४८.५ मि. मी. पाऊस अपेक्षित असताना याच कालावधीत ४४४.८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण सरासरीपेक्षा ७९ टक्के अधिक आहे. तथापि, या तालुक्यातील प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने १५ प्रकल्पांत मिळून केवळ १८.७० टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.
-----------
तालुकानिहाय लघु प्रकल्प व जलसाठा टक्केवारी
तालुका - प्रकल्प - टक्केवारी
वाशिम - ३६ - ७.०९
मालेगाव - २३ - ४१.३५
रिसोड - १९ - १२.७८
मं.पीर - १५ - १८.७०
मानोरा - २५ - ४७.१८
कारंजा - १६ - ४०.७७
--------------------------------
मध्यम प्रकल्पांची स्थिती
प्रकल्प जलसाठा (टक्के)
सोनल - ३६.३५
एकबुर्जी - ४४.४४
अडाण - ४६.७८
--------------------