शासनानेही झटकले हात : जिल्ह्यात ४.८३ लाख क्विंटल तूर पडून
वाशिम : हमीदराने यापुढे शासन तूर खरेदी करणार नाही, असे केंद्राने जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर व्यापाऱ्यांना खरेदी करून घ्यावी लागणार आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेतील तूरीचे घसरलेले दर पाहता ५०५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दराने तूर विकत घेवून ती कुठे विकणार, असा प्रश्न उपस्थित करित व्यापाऱ्यांनी तूर खरेदीस नकार दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. शासनाच्या दिशानिर्देशानुसार वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी १५ ते ३१ मे या कालावधीत १७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना ह्यटोकनह्ण दिले. मात्र, १० जूनपासून ह्यनाफेडह्णने तूर खरेदी बंद केल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची ४.८३ लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर खरेदीअभावी घरातच पडून आहे. यासंदर्भात राज्यशासनाने केंद्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून किमान ह्यटोकनह्ण दिलेल्या शेतकऱ्यांची तूर तरी खरेदी करून घेण्यास मंजूरात देण्याची विनंती केली; परंतू केंद्राने हा प्रस्ताव फेटाळला असून व्यापाऱ्यांकरवी हमीदराने तूर खरेदी करावी, असे निर्देश देवून आपले हात झटकले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची पडून असलेल्या तूर खरेदीची जबाबदारी बाजार समित्यांना पेलावी लागणार आहे. असे असले तरी जागतिक बाजारपेठेतच तूरीला अपेक्षित दर मिळणे कठीण झाल्याने व्यापारी तरी हमीदरापेक्षा अधिक दराने तूर कशी खरेदी करतील, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे हमीदरापेक्षा कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचा फतवा जाहीर झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकूणच या सर्व गदारोळात आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून लाखो क्विंटल तूर कशापद्धतीने खरेदी केली जाईल, त्यास नेमका दर किती मिळेल, शासनाचे याप्रती धोरण काय असेल, आदी प्रश्नांनी त्यांना घेरले आहे.