लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात सर्वत्र कोरोनो विषाणुच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे अनेक राज्यातील मजुर वर्ग जिल्हयात अडकलेले आहेत. अशाच छत्तीसगडमधील अडकलेल्या मजुरांना अंध कलावंतांनी आपल्या कलेव्दारे मिळालेल्या पैशातून मदतीचा हात दिला.वाशिम तालुकयातील चेतन सेवांकुरचे अंध कलावंत विविध सामाजिक उपक्रमाव्दारे आपल्या चेतन सेवांकुरामधील १३ अंध मुलांचा सांभाळ करताहेत. संपूर्ण जिल्हयात संचारबंदी लागू झाल्यानंतर त्यांच्या अन्नपाण्याचा प्रश्न निर्माण झाला असतांनाही त्यांनी कुंभारखेड येथे अडकलेल्या छत्तीसगड येथील २५ मजुर जे परिसरातील पुलाच्या कामासाठी आले होते त्यांना भेटून त्याची आपबिती ऐकून घेतली व त्यांना धान्याचा पुरवठा केला. तसेच आर्थीक मदतही केली. अंध मुलांच्या या उपक्रमाचे मजुरांनी कौतूक केले. वाशिम तालुक्यातील कुंभारखेडा येथे एका पुलाच्या कामासाठी सहा महिन्यांपूर्वी छत्तीसगड राज्यातील जवळपास २५ मजूर आले होते. त्यांचे कामही सुरळीत सुरू होते. अश्यात काही दिवसांपासून कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉक डावून सुरू झाल्याने त्या मजुरांना आपले काम थांबवावे लागले. आणि त्यातच त्या कामाचे ठेकेदार सुद्धा आपल्या राज्यात निघून गेल्याने व लॉक डाऊनमुळे परत न येऊ शकल्याने मजुरांना कुणी वालीच उरला नाही. ही माहिती अंध कलावंताना कळल्याने त्यांनी मदत केली.कुंभारखेडा येथे छत्त्तीसगड येथील मजुर अडकल्याने पोलीस पाटील नामदेव ठाकरे यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. मात्र, खाण्यापिण्याचा प्रश्न कायम असल्याची माहिती चेतन सेवांकुरचे संचालक पांडुरंग उचीतकर यांना मिळाली. यानंतर त्यांनी मजुरांची माहिती घेतली आणि मदत करण्याचे ठरविले.त्यांना गहू, तांदूळ , डाळ व काही आर्थिक मदत पोहोचविली. यावेळी अंध कलावंत चेतन उचीतकर च्या हस्ते मदतीचे वितरण करण्यात आले. यावेळी छत्तीसगड येथील मजुरांनी चेतन सेवांकुरच्या कलाकाराबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
परराज्यातील मजुरांना अंध कलावंतांकडून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 3:16 PM