लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१५-१६ नंतर केंद्र शासनाने जिल्हास्तरिय हातमाग कापड प्रदर्शनीच्या आयोजनास मंजूरी प्रदान केली नव्हती. यंदा मात्र विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये ही प्रदर्शनी भरविली जाणार असून त्यासाठी २५ लाखांच्या निधीस २९ जानेवारीला मान्यताही देण्यात आली आहे.केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम योजनेंतर्गत सन २०१५-१६ पर्यंत राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रदर्शनीसह जिल्हास्तरीय हातमाग कापड प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. मात्र, मागील दोन वर्षांपासून ही प्रदर्शनी भरविण्यात आली नव्हती. यामुळे हातमाग विणकरांची परिस्थिती हलाखीची झाली. ही बाब लक्षात घेवून विणकरांच्या हाताला काम मिळावे व त्यांनी उत्पादित केलेल्या वाणाला योग्यप्रकारे प्रसिद्धी मिळावी. यामाध्यमातून हातमाग कापडांची विक्री होवून विणकरांच्या उदरनिर्वाहास हातभार लागावा, या उद्देशाने सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत प्रत्येकवर्षी पाच जिल्हास्तरीय हातमाग कापड प्रदर्शने आयोजित करण्यासाठी प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे २५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दर्शविली आहे.....................कोट :हातमाग कापडांना नागरिकांमधून चांगली मागणी असते. मात्र, गत दोन वर्षांपासून जिल्हास्तरीय प्रदर्शनीस शासनाकडून मंजूरी मिळालेली नव्हती. आता मात्र हे प्रदर्शन भरविले जाणार असल्याने नागरिकांची गरज पूर्ण होण्यासोबतच विणकरांनाही त्याचा लाभ होणार आहे.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम
दोन वर्षाच्या ‘ब्रेक’नंतर यंदा भरणार हातमाग कापड प्रदर्शनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 5:03 PM