मानाेरा : कोरोनामुळे पंढरपूरची वारी करता येत नसल्याने वारकरी वर्गाच्या डोळ्यात अश्रू निर्माण झाले आहेत. यंदाही पांडुरंगाचे दर्शन होणार नसल्याने वारकऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. वारकरीवर्गाचे मन पंढरपुरात लागून राहिले आहे.
वारकरी शरीराने आपापल्या गावी असले तरी त्यांच्या मनात दिंडीची हुरहुर सुरू झाली आहे. वारकरी वर्गाची पावले मनाने पंढरीच्या वाटेवर चालू लागली आहेत. ‘लागला टकळा पंढरीचा’ अशी अवस्था वारकरीवर्गाची झाली आहे.
वारीच्या वाटेवर आलेला अनुभव काही वारकरी आता आपल्या गावातील पारावर बसून, डोळ्यातील अश्रू पुसत एकमेकांना सांगत आहेत. आजच्या तिथीनुसार दिंडी कुठे मुक्कामी राहाते. तेथे कोणाचे कीर्तन राहाते. हे कथन करताना वारकरी वर्गाचे मन भरून येते.
त्यामुळे ‘पंढरीची वारी आहे माझे घरी’असे अभिमानाने सांगणाऱ्या वारकरी मंडळींना यंदाही मात्र कोरोनाच्या साथीमुळे घरीच थांबावे लागणार आहे. काेराेना संसर्ग पाहता गत दाेन वर्षांपासून वारकऱ्यांची पंढरपूर वारी चुकत असली तरी महामारी पाहता घरुनच पांडुरंगाचे दर्शन घेण्याचे वारकऱ्यांनी ठरविले आहे.