सुनील काकडे वाशिम, दि. ३0- कधीकाळी डाळिंब, द्राक्ष, पपई, संत्रा यांसह इतर फळबागांच्या माध्यमातून शेतकर्यांची आर्थिक उन्नती साध्य होऊ लागली होती; मात्र नैसर्गिक आपत्ती तथा तांत्रिक मार्गदर्शनाचा अभाव, या कारणांमुळे जिल्हय़ात गत चार वर्षात फलोत्पादनाचा आलेख सुमारे ८५ टक्क्याने खालावला आहे. २0१२-१३ मध्ये फळबागांचे असलेले १५0७.९७ हेक्टर क्षेत्र सध्या केवळ १३३.५८ हेक्टरवर स्थिरावले आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात साधारणत: ४.५ लाख आणि रब्बी हंगामात १ लाख हेक्टरच्या आसपास पारंपरिक पिकांची पेरणी केली जाते; परंतु तीच ती पिके वारंवार घेतली जात असल्याने शेतीचा कस बिघडत चालला असून, शेतमालाच्या उत्पादनात वर्षागणिक घट होत आहे. ही बाब लक्षात घेता फळबागांचे क्षेत्र वाढविण्यावर प्रशासनाने विशेष भर द्यायला हवा. माती परीक्षणांती आणि हवामानाधारित कुठल्या जमिनीत कुठल्या फळबागा तग धरू शकतात, याचे शास्त्रोक्त मार्गदर्शन शेतकर्यांना मिळायला हवे; मात्र कृषी विभागाकडून तसे ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. परिणामी, शेतकर्यांनी स्वयंस्फूर्तीने लागवड केलेल्या फळबागादेखील आजमितीस नामशेष झाल्या आहेत.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सन २0१२-१३ मध्ये संत्रा, डाळिंब, सीताफळ, आंबा, मोसंबी, आवळा, कागदी लिंबू, पेरू, जांभूळ, फणस अशा सर्वच फळांची यशस्विरीत्या लागवड करण्यात आली होती. त्याचे एकंदरीत क्षेत्र तब्बल १५0७.९७ हेक्टरवर पोहोचले होते. यात संत्रा, आंबा आणि फणसची विक्रमी लागवड झाली होती; मात्र दुसर्याच वर्षी अर्थात २0१३-१४ मध्ये फळबाग लागवड क्षेत्रात घट होत १६६.६५ हेक्टरची प्रत्यक्ष लागवड झाली. या वर्षांंंत मोसंबी, पेरू, जांभूळ आणि फणस या फळांची लागवड शून्य होती. त्यानंतर २0१४-१५ मध्ये ३८५.९५, २0१५-१६ मध्ये १४५.१0 आणि २0१६-१७ मध्ये फळबाग लागवड क्षेत्रात विक्रमी घट होत केवळ १३३.५८ हेक्टर क्षेत्रावर संत्रा, डाळिंब, सीताफळ, आंबा आणि मोसंबीचा काहीअंशी समावेश असून आवळा, कागदी लिंबू, पेरू, जांभूळ आणि फणसाची लागवड शून्य आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे २0१२-१३ मध्ये जिल्ह्यात ४१९.२४ हेक्टरवर लागवड झालेल्या संत्र्याचे क्षेत्र सध्या केवळ ३८.१0 हेक्टरवर आल्याचे दिसून येत आहे.
फलोत्पादनाचा आलेख खालावला!
By admin | Published: January 31, 2017 2:50 AM