लोकमत न्युज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : रब्बी हंगामातील गहू पिकाच्या काढणीसाठी परिसरातील शेतकरी हार्वेस्टर यंत्राचा आधार घेत आहेत. कुठे मजुरांचा तुटवडा असल्याने हा प्रयोग शेतकºयांसाठी फायद्याचा ठरत असला तरी, कुठे मजूर असतानाही हॉर्वेस्टरमुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे हा प्रयोग शेतकरी आणि शेतमजुरांसाठी साधक-बाधक ठरत असल्याचे स्पष्ट होते.यंदाच्या रब्बी हंगामात गहू पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली होती. मुबलक जलसाठा असल्यामुळे इंझोरी परिसरातील शेतकºयांनी, तर तूर सुकण्यापूर्वीच कापणी करून गहू पिकाची पेरणीही केली. त्यामुळे या परिसरात यंदा गहू पिकाचे क्षेत्र ४०० एकरपेक्षा अधिक झाले आहे. आता यातील बहुतांश शेतकºयांचे गहू पीक काढणीवर आले आहेत. हे पीक काढण्यासाठी शेतकरी हार्वेस्टर यंत्राचा आधार घेत आहेत. या यंत्रामुळे कमी वेळेत आणि कमी खर्चात अधिक प्रमाणात गहू पिकाची काढणी होत असल्याने शेतकरी हार्वेस्टरलाच पसंती देत आहेत, तर काही ठिकाणी मात्र मजुरांचा तुटवडा असल्यानेही शेतकºयांना या यंत्राचा वापर करावा लागत आहे. मानोरा तालुक्यात खरीप हंगामानंतर रोजगाराचा प्रश्न गंभीर होत असल्याने शेतकरी परजिल्ह्यात स्थलांतर करतात. यंदाही ती परिस्थिती कायम आहे. तथापि, काही गावातील मजूर मुलांच्या शिक्षणासाठी गावांतच थांबले असतानाही हार्वेस्टरचा वापर वाढल्याने त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी आली आहे. बिजोत्पादक शेतकºयांसाठी पद्धती घातकहार्वेस्टरच्या वापरामुळे गहू पिकाची काढणी कमी खर्चात आणि कमी वेळेत अधिक करता येते. साधारणपणे अर्ध्या तासात एक एकर क्षेत्रातील गहू पिकाची काढणी अवघ्या १५०० रुपयांत यामुळे होते. तथापि, या यंत्राने गहू काढणी करताना हार्वेस्टरच्या दात्या गव्हाच्या बिजांना घासतात. त्यामुळे गहू बिजांच्य नख्या तुटल्याने त्यांची उगवण क्षमता नष्ट होण्याचे प्रमाण वाढते. म्हणून बिजोत्पादकांनी सहसा या यंत्राचा वापर टाळावा, असे आवाहन महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
गव्हाच्या काढणीसाठी हार्वेस्टरचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 5:57 PM