लोकमत न्यूज नेटवर्कशिरपुर जैन (वाशिम) : येथील हजरत मिर्झा बाबा यांच्या उर्सनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत हरियाणाचा नरेंद्र पैलवान याने हिंगोलीच्या दिगंबर पैलवानावर मात करीत विजेतेपद पटकाविले आहे. शिरपूर येथे हजरत मिर्झा बाबा यांच्या ऊर्सला १ नोव्हेंबरपासून प्रारंभ झालेला आहे. यादरम्यान ३ नोव्हेंबर रोजी कुस्त्यांची दंगल पार पडली. पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या हस्ते कुस्त्यांच्या दंगलीचे उदघाटन करण्यात आले होते. या कुस्त्यांच्या दंगलीमध्ये जालना, औरंगाबाद, वाशिम, हिंगोली, सोलापूर, कोल्हापूर यासह दिल्ली, हरियाणाच्या मल्लांनी सहभाग नोंदविला होता. रात्री उशिरापर्यंत कुस्त्यांची दंगल सुरू होती. या स्पर्धेचे पहिल्या २१ हजार रुपयांच्या बक्षिसांचा मानकरी हरियाणाचा मल्ल नरेंद्र पैलवान ठरला आहे. उपविजेता म्हणून हिंगोलीच्या दिगंबरला पैलवानाला घोषित करण्यात आले. प्रथम बक्षीस आयुब ठेकेदार यांच्या हस्ते नरेंद्र पैलवानाला देण्यात आले. यावेळी राजु पाटील इंगोले, संतोष भालेराव, शुभम इंगोले, सतिश वानखेडे, विलास गवळी, सलीम रेघीवाले, रमजान रेघीवाले, अजीज यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कुस्तीप्रेमींची उपस्थिती होती.
कुस्ती स्पर्धेत हरियाणाचा नरेंद्र ठरला विजेता !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 5:28 PM