रिसोड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या काही वर्षांत लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला असून काही दिवसांपूर्वी सहकारी उपनिबंधक कार्यालय विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. आता चौकीदार निवासाचीही विक्री झाल्याचा आरोप बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठलराव आरू यांनी केला आहे.
यासंदर्भात आरू आणि डॉ. रामेश्वर नरवाडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, साधारणत: एक वर्षापूर्वी अतिशय नाममात्र दरात लीज पट्टा करण्यात आला. संचालक मंडळाच्या सभेत चौकीदार निवास विक्रीबाबत किंवा लीजबाबत कोणताही ठराव घेण्यात आला नाही. विना ठराव चौकीदार निवास लीज पट्ट्यावर विक्री करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवारात असलेल्या मालमत्ता, गाळे अनधिकृत लीज व विक्री करण्यात आल्या, असा आरोपही माजी उपसभापती विठ्ठलराव आरू, डॉ. रामेश्वर नरवाडे यांनी केला आहे.