लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शाळेमध्ये लग्नसोहळा आटोपल्यानंतर शाळेची स्वच्छता करण्यात आली नाही. या गंभीर मुद्यावरून कवठळ येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख चांगलेच गोत्यात सापडले असून, दोघांनाही निलंबित का करण्यात येऊ नये, अशा सबबीखाली ‘शो-कॉज’ नोटिस बजावण्यात यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांना १२ जून रोजी दिले आहेत.उन्हाळ्याच्या दिवसांत कवठळ येथील जिल्हा परिषद शाळा लग्नकार्यासाठी देण्यात आली होती. हा सोहळा आटोपल्यानंतर नियमानुसार शाळेची सर्वंकष स्वच्छता होणे क्रमप्राप्त होते; परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान शाळेत सर्वत्र अस्वच्छता आढळून आली. याप्रकरणी १२ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या दालनात पार पडलेल्या ‘स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र टास्क फोर्स’च्या बैठकीत चर्चा घडून आली. यावरून कवठळ शाळेचे मुख्याध्यापक कतोरे आणि केंद्रप्रमुख दादा गवई यांना निलंबित का करण्यात येऊ नये, अशी नोटिस बजावण्याचे निर्देश गणेश पाटील यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांना दिले. त्यामुळे शाळा अस्वच्छतेचे प्रकरण संबंधित मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखाच्या चांगलेच अंगलट आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दिशानिर्देशानुसार कवठळ येथील शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांना १३ जून रोजी कारणे दाखवा नोटिस बजावण्यात येणार आहे. - अंबादास मानकरप्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम
शाळा अस्वच्छतेप्रकरणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ‘गोत्यात’!
By admin | Published: June 13, 2017 1:19 AM