वाशिम : कोरोनातून सुखरूप बचावलो; परंतु भविष्यात कोरोना संसर्ग झाला तर, नोकरी गेली तर, रोजगार मिळेल का? किंवा उद्योग-धंद्याचे बारा वाजले तर...? अशा एक ना अनेक नकारात्मक विचारांमुळे अनेकांना चिंतारोग, निद्रानाशाला बळी पडावे लागत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांच्या तपासणीतून समोर येत आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर चिंतारोग, निद्रानाश या समस्येने ग्रासलेल्या रुग्णांच्या ओपीडीत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे मानसोपचार तज्ज्ञ सांगतात.
भावनिक व शारीरिक स्वरूपाचा एक अनुभव तसेच सुप्त मनातील नकारात्मक अनुभवांचा किंवा एखाद्या प्रसंगाबद्दल होणाऱ्या मनातील द्वंद्वाचा बाह्य आविष्कार म्हणून चिंतारोगाकडे पाहिले जाते. जीवनातील अनेक लहान-मोठ्य़ा प्रसंगांना सामोरे जाताना एखाद्या वेळी खूप भावुक वाटायला लागते. मनात खूप चिंता दाटून येते. काहीतरी वाईट होणार आहे वा काहीतरी हातातून निसटून जाणार आहे, असे वाटून जेव्हा जीव गुदमरायला लागतो आणि झोपही उडते; तेव्हा चिंतारोग, निद्रानाशाची समस्या निर्माण झाली, असे समजले जाते. कोरोनामुळे अनेकांच्या मनात असे नकारात्मक विचारांचे बीजारोपण झाल्याचे समोर येत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनातून सुखरूप बचावलो; परंतु तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आपले, कुटुंबाचे काय होईल? नोकरी, रोजगार तर हिरावला जाणार नाही, असुरक्षिततेची भावना, उद्योग-धंदा तर ठप्प पडणार नाही. आर्थिक परिस्थिती ढासळणार तर नाही ना? अशा एक ना अनेक नकारात्मक विचारांमुळे कोरोनातून बरे झालेल्या अनेकांमध्ये चिंतारोग, निद्रानाशाची समस्या आढळून येत आहे. अशा परिस्थिती कुटुंबीयांनी संबंधित रुग्णाला धीर देणे, त्याच्यामध्ये सकारात्मक विचारांची पेरण करणे आवश्यक आहे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.
..................
चिंतारोग कमी कसा करावा?
कुटुंबीयांनी संबंधित रुग्णाच्या मनातील असुरक्षिततेची भावना काढून टाकण्याचा प्रयत्न करावा, धीर द्यावा, कोरोना झाला म्हणजे प्रत्येकजण गंभीरच होतो असे नाही हे पटवून द्यावे, कोणतीही परिस्थिती ही कायमस्वरूपी नसते; ती बदलत असते आणि आपण त्या परिस्थितीवर मात करू शकतो, असा सकारात्मक विचार संबंधित रुग्णामध्ये रुजवावा, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला.
.............
आजची परिस्थिती उद्या बदलणारच..!
कोट
निद्रानाश, चिंतारोग या समस्या घेऊन येणाऱ्यांची ओपीडी पाच ते दहा टक्क्यांपर्यंत गेली आहे. अशा रुग्णाला धीर देत आजची वाईट परिस्थिती उद्या नसणार, परिस्थिती बदलणार आहे, हे पटवून द्यायला हवे.
- डॉ. नरेश इंगळे,
मानसोपचार तज्ज्ञ वाशिम.
.....
काही जणांना असुरक्षिततेची भावना, नकारात्मक विचार व अन्य कारणांमुळे चिंतारोग, निद्रानाश जडत असल्याचे दिसून येते. सकारात्मक विचार, नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आदी आवश्यक आहे.
- डॉ. मंगेश राठोड,
मानसोपचार तज्ज्ञ वाशिम
....................
कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना चिंतारोगाने ग्रासले असल्याचे तपासणीतून समोर येत आहे. कुटुुंबीयांचे मानसिक पाठबळ आणि डॉक्टरांचा योग्य सल्ला, उपचार यामुळे या आजारावर मात करता येऊ शकते.
- डॉ. रवींद्र अवचार,
मानसोपचार तज्ज्ञ वाशिम