००००००००००००००
किन्हीराजा परिसरात रिक्त पदांचे ग्रहण
वाशिम : किन्हीराजा जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये महसूल, पंचायत, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांची १० ते १२ पदे रिक्त आहेत. यामुळे कामकाज प्रभावित होत असल्याचे दिसून येते.
०००००
शैक्षणिक शुल्कात सवलत द्या
वाशिम : कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झालेली आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्यक्ष शिक्षण बंदच होते. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आहे. त्यामुळे शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याची मागणी पालकांनी शुक्रवारी केली.
०००००
पार्डी येथे आरोग्य जनजागृती
वाशिम : पार्डीटकमोर परिसरातही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत आरोग्य विभागातर्फे नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. शनिवारी पार्डी टकमोर येथे दोन कोरोना रुग्ण आढळून आले.
००००
रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित
वाशिम : गत दोन महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने केनवडसह रिसोड तालुक्यातील रोजगार सेवकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. प्रलंबित मानधन देण्याची मागणी रोजगारसेवक संघटनेने पंचायत समितीकडे केली.
००
‘केमोथेरपी’च्या सुविधेची प्रतीक्षाच
वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य शासनाने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात केमोथेरपी युनिटकरिता आवश्यक असलेल्या उपकरणांची खरेदी करण्यासाठी ३ लाख ४० हजार ३३५ रुपये खर्चास ८ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली होती. अद्याप निधीची तरतूद नसल्याने ही सुविधा वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध होऊ शकली नाही.
००
वन्यप्राणी पाण्याच्या शोधात शहराकडे
वाशिम : दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने जंगलातील नैसर्गिक पानवठे तसेच नदीनाल्यांची पाणीपातळी खालावली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळेनासे झाल्याने त्यांची मानवी वस्त्यांकडे धाव सुरू असल्याचे दिसून येत आहे.
००
डव्हा ते मेडशी रस्त्याचे काम अपूर्ण
वाशिम : डव्हा ते मेडशी पालखी रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अपूर्णच आहे. संत नगरी शेगाव ते पंढरपूर या पालखी मार्गावरील मेडशी ते डव्हा रस्त्याचे काम गत दोन वर्षांपूर्वी सुरू केले होते.
००
शिरपूरचे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे १९ ते २१ मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस, वारा व गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे केले होते. शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा लागून आहे.
००
भाजीबाजारात उसळली गर्दी ! (फोटो)
वाशिम : रविवारी दुपारी १२ वाजेपासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी असल्याने सकाळी ८ ते ११ या वेळेत स्थानिक सुंदरवाटिकास्थित भाजीबाजारात नागरिकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. कुठेही फिजिकल डिस्टन्सिंग नसल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
०००
तिब्बल सीट वाहतूक; पोलिसांची कारवाई
वाशिम : स्थानिक पाटणी चौकात शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तळ ठोकून रविवारी सकाळच्या सुमारास प्रामुख्याने तिब्बल सीट वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांवर कारवाई केली. संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला.
००
पाणंद रस्ता कामाच्या चौकशीची मागणी
वाशिम : तालुक्यातील ब्रम्हा ते वारला दरम्यान पाणंद रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची चौकशी करावी. तोपर्यंत देयकाची अदायगी करू नये, अशी मागणी ब्रम्हा येथील शेतकऱ्यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली.
००
गृहविलगीकरणातील नागरिकांवर वॉच
वाशिम : गृह विलगीकरणातील कोरोना बाधितांनी किमान १४ दिवस घराबाहेर पडू नये, असे सक्त निर्देश प्रशासनाने दिलेले आहेत. गृह विलगीकरणातील कोरोना बाधितांवर प्रशासनाचा ‘वॉच’असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिली.
०००
एटीडीएम मशीन कार्यान्वित करा
वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, बाजार समिती आदी ठिकाणी शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी एटीडीएम मशीन कार्यान्वित करण्यात आली; मात्र त्यास नादुरुस्तीचे ग्रहण लागले असून कडक निर्बंध शिथिल झाल्यानंतर सर्व मशीन कार्यान्वित करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
००
कृषी प्रशिक्षण आराखडा
वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असून, पीक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाने कृषी सखी व उमेद अभियानात सहभागी महिलांना ऑनलाईन पद्धतीने कृषीविषयक प्रशिक्षण दिले जात आहे.
००