०००००००००००
रेतीअभावी घरकुलांची कामे प्रभावित
वाशिम : कडक निर्बंध लागू असल्यामुळे घरकुल व इतर बांधकामांसाठी रेती मिळणेही कठीण झाले आहे. जिल्ह्यात जवळपास तीन हजार घरकुले साकारणार आहेत. बांधकामासाठी रेती केव्हा मिळणार? याकडे घरकुल लाभार्थींचे लक्ष लागून आहे.
०००००
अग्निरोधक यंत्रे केव्हा बसविणार?
वाशिम : शासकीय कार्यालये, बँका, ग्रामीण रुग्णालय यासोबतच काही खासगी रुग्णालयांत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक अशी अग्निरोधक यंत्रे बसविलेली नाहीत. त्यामुळे आग लागल्यास तातडीने नियंत्रण कसे मिळवावे? असा प्रश्न आहे. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.
००००
कोरोनामुळे लघुव्यवसाय ठप्प
वाशिम : कोरोनामुळे कडक निर्बंध लागू असल्यामुळे जिल्ह्यातील लघुव्यवसाय ठप्प पडले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांवर संकट ओढवले असून, शासनाने लघु व्यावसायिकांसाठी एखादे पॅकेज जाहिर करावे, अशी मागणी लघुव्यावसायिकांनी शुक्रवारी केली.
०००००००
मास्क न वापरल्याबद्दल दंड !
वाशिम : मास्कचा वापर न केल्याबद्दल शहर वाहतूक शाखेच्या चमूने १४ मे रोजी जवळपास ३२ जणांवर दंडात्मक कारवाई केली. नागरिकांनी मास्कचा वापर करावा अन्यथा यापुढेही कारवाई केली जाईल, असा इशारा शहर वाहतूक शाखेने केले.
०००
अंगणवाडी केंद्रांसाठी निधी मिळाला !
वाशिम : रिठद, अडोळी, तोंडगाव जिल्हा परिषद गटातील अंगणवाडी केंद्र इमारत दुरूस्तीसाठी, नवीन इमारतीसाठी महिला व बालकल्याण विभागाकडून निधी मिळालेला आहे; परंतु कोरोनामुळे बांधकामे सुरू होऊ शकली नाहीत. अंगणवाडी केंद्राचे बांधकाम सुरू केव्हा होणार? याकडे लक्ष लागून आहे.