लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : राष्टÑीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत मानोरा तालुक्यात ० ते १८ वर्षे वयोगटामधील मुलांची आरोग्य तपासणी केली जात आहे. आतापर्यंत २६ विद्यार्थ्यांवर विविध शस्त्रक्रिया झाल्या असून, तपासणीअंती आणखी दोन मुलांना हदय शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे रवाना करण्यात आले.या तपासणीदरम्यान दुर्धर आजार आढळून आल्यास उपचार व आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. संशयीत ह्रदयरोग असलेल्या विद्यार्थ्यांची आवश्यक ती तपासणी केली जाते. यावर्षी ३० संशयीत ह्रदयरुग्ण असलेल्या मुलांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी गरजू ४ लाभार्थ्यांची शस्त्रक्रिया केली असून, ५ जानेवारी रोजी मानोरा तालुक्यामधील २ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथे रवाना करण्यात आले. शासकीय योजनेंतर्गत ही ह्रदय शस्त्रक्रिया पुर्णपणे मोफत केली जाते. २०१८-१९ या वर्षात शाळांमध्ये आरोग्य तपासणी पुर्ण झाली असून, अंगणवाडीतील बालकांच्या तपासणीची व्दितीय फेरी सध्या सुरु आहे. या वर्षामध्ये ४ ह्रदय शस्त्रक्रिया व २२ इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तपासणीअंती दोन मुलांना हृदय शस्त्रक्रियेसाठी रवाना करतेवेळी मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोहाड, विस्तार अधिकारी गोविंद व्यवहारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वैभव खंडसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सागर जाधव, तालुका आरोग्य सहायक डॉ.राजेंद्र मानके, एकात्मीक बाल विकास प्रकल्प अध्ािकारी आदिनाथ इंगोले, गटशिक्षणाधिकारी अनिल पवार, पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेंद्र जगळपुरे व डॉ.ललीत हेडा, औषधी निर्माण अधिकारी अनिल खडसे तसेच आरोग्य सेविका पुष्पा वेळूकार, सीमा चोरमागे व इतर कर्मचारी हजर होते.
आरोग्य तपासणी मोहिम; २६ विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 1:42 PM