मानोरा तालुक्यामध्ये माजी आमदार स्व. गजाधर राठोड यांच्या प्रयत्नाने २८ गावांमध्ये चिर्कुटा धरणामधून जलवाहिन्यांद्वारे पेयजलाची महत्त्वाकांक्षी योजना राबविली जाते. यामध्ये कारखेडा या गावाचाही समावेश करण्यात आलेला आहे.
अरुणावती नदीच्या तीरावर वसलेल्या आणि जवळपास तीन हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या या गावाला दिवसाआड महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाइपलाइनद्वारे लोकांची तहान व इतर जीवनावश्यक गरजा या पाण्याद्वारे भागविल्या जातात. मजीप्राची गावाला पाणी पुरवणारी पाइपलाइन तांड्यातील विलास राठोड यांच्या घरा शेजारील विहिरीजवळ तुंबलेल्या गटारामध्ये फुटली असल्याने नालीतील घाण पाणी या पाइपलाइनमध्ये साचत असते आणि हेच घाण पाणी नळ येतात त्यावेळी १०० पेक्षा अधिक कुटुंबियांच्या घरी एक दिवसाआड येते.
आधीच कोरोना या घातक विषाणूचा सामना करीत असलेल्या ग्रामस्थांना तातडीने हे फुटलेले पाइप दुरुस्त न केल्यास जलजन्य आजाराचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत.