लोकमत इम्पॅक्ट
वाशिम : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्व डॉक्टरांकडून आरोग्य विभागाने वैद्यकीय प्रमाणपत्र मागविले आहे. यामुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून, प्रत्यक्षात काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागून आहे. बोगस डॉक्टरसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले, हे विशेष.
वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरातील एका दवाखान्यात विलास ठाकरे नामक बोसग डॉक्टरकडून अवैध गर्भपाताचा प्रयत्न झाल्याने आरोग्य क्षेत्र ढवळून निघाले. अधिकृत डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काही वर्षे सेवा दिल्यानंतर, या अनुभवाच्या जोरावर अनेक जण ग्रामीण भागात दवाखाना थाटतात. ग्रामीण भागात बोगस डॉक्टरकडून रुग्णांवर सर्रास उपचार केले जात आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारीही प्राप्त झालेल्या आहेत. ‘लोकमत’ने देखील वृत्त प्रकाशित करून याकडे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. याची दखल घेत जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. त्यानुसार तालुकास्तरीय समितीचे प्रमुख गटविकास अधिकारी यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी दिल्या. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्व डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मागविण्यात आले आहेत. प्राप्त झालेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये बोगस प्रमाणपत्र आढळून येणाऱ्यांविरूद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
०००००००
बोगस डॉक्टर होताहेत भूमिगत
ग्रामीण भागातील डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मागविण्यात आल्याने कारंजा व मंगरूळपीर तालुक्यात काही ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय थाटणारे बोगस डॉक्टर गत तीन, चार दिवसांपासून दिसेनासे झाल्याचे विश्वसनीय सूत्राने सांगितले. या बोगस डॉक्टरांची प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या काही कर्मचाऱ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळे तालुकास्तरीय समितीने आरोग्य केंद्र, उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बोगस डॉक्टरांची माहिती घेतल्यास कारवाईमध्ये अधिक स्पष्टता येईल, असेही बोलले जात आहे.
००००००००००००००
... तर गुन्हा दाखल
वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांकडून प्रमाणपत्र मागविण्यात आले आहेत. या प्रमाणपत्रांची पडताळणी तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिलेले आहेत. दरम्यान, अधिकृत व्यवसाय करणारे डॉक्टर प्रमाणपत्र सादर करीत आहेत. मात्र, अनेक भागात बोगस डॉक्टर भूमिगत होत असल्याने ते प्रमाणपत्र सादर करण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे कारवाई कुणावर करणार?, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
००००००००००००००
‘पीसीपीएनडीटी’सारख्या टोल फ्री क्रमांकाची सोय असावी
अवैध गर्भपात, भ्रूण हत्या टाळण्यासाठी ‘पीसीपीएनडीटी’ अंतर्गत टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ‘अवैध गर्भपात होत असल्याची माहिती द्या आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा’, असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. त्यानुसार टोल फ्री क्रमांकावर गुप्त माहिती मिळाल्याने वाशिम शहरात दोन जणांवर कारवाई करण्यात आली. याप्रमाणेच बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध केली तर कारवाई अधिक सुलभ होईल, असा सूर उमटत आहे.