लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : किशोरवयीन मुलींना वयानुसार होणारे बदल आणि त्यानुसार घेण्याची काळजी याबाबत गेल्या तीन वर्षांपासून इंझोरी येथील समाजसेविका अॅड. मनिषा दिघडे मार्गदर्शन करीत आहेत. परिसरातील शाळांत यासाठी मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन त्या करीत असून, २१ सप्टेंबर रोजीही इंझोरीच्या जि.प. शाळेत त्यांनी ही कार्यशाळा घेतली.किशोरवयीन मुलीत वयानुसार बदल होत असताना असमंजसपणामुळे अवघडल्यासारखे वाटते. शारीरिक बदल स्विकारताना त्या संकोचतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.अशात त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असते. ही बाब लक्षात घेऊनच इंझोरी येथील समाजसेविका अॅड. मनिषा दिघडे या मागील तीन वर्षांपासून विविध शाळांत कार्यशाळेच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन मार्गदर्शन करीत आहेत. या उपक्रमांतर्गत २१ सप्टेंबर रोजी त्यांनी इंझोरीच्या जि.प. शाळेत कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत किशोरींना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, मासिक पाळी ही मातृत्वाची पहिली व आवश्यक पायरी असून, तिची भीती बाळगणे वा विटाळ पाळण्याचे काहीही कारण नाही. उलट स्त्रीला मिळालेले ते एक वरदान आहे. त्यामुळे कोणत्याही संकोचाविना ते स्त्रीने आनंदाने स्विकारावे. या काळात आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून स्वच्छतेची व पुरेशा विश्रांतीची गरज असते. या काळात सदैव सॅनिटरी नॅपकिनचा वाप करावा, असा सल्ला देतानाच त्यांनी किशोरींना वयानुसार होणारे शारीरिक बदल, तसेच आरोग्याची निगा राखण्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षिका पुष्पलता पवार यांनीही किशोरींना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सुचिता भोजापुरे, ग्रा.प. सदस्या गोपाली दिघडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्वाती देशमुख, तर आभार प्रदर्शन सविता ढोरे यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व किशोरवयीन मुलींची उपस्थिती होती.
किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 2:34 PM