वाशिम : संभाव्य तिसऱ्या लाटेतील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आतापासूनच सज्ज होणे आवश्यक असून, ऑक्सिजन, औषधीचा पुरेसा साठा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या जिल्हा टास्क फोर्स, कोविड हॉस्पिटल चालविणारे खासगी डॉक्टर यांच्या सभेत ते बोलत होते.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांच्यासह जिल्हा टास्क फोर्सचे सदस्य, कोविड हॉस्पिटल चालविणारे खासगी डॉक्टर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, शासकीय व खासगी क्षेत्रातील वैद्यकीय सुविधा आणखी सक्षम करण्याची गरज लक्षात घेऊन त्यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करावे. विशेषतः ऑक्सिजनची उपलब्धता आणि कोरोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक औषधीचा पुरेसा पुरवठा होण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. सुदैवाने जिल्ह्यात उभा राहत असलेल्या शासकीय व खासगी ऑक्सिजन प्लांटमुळे जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. तरीही प्रत्येक खासगी हॉस्पिटलमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा, सेंट्रल ऑक्सिजन लाईन, व्हेंटिलेटर यासह इतर उपकरणे व मनुष्यबळ याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार सज्जता ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी हिंगे यांनी कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात अपेक्षित असलेल्या आरोग्य सुविधांची माहिती दिली. दुसऱ्या लाटेदरम्यानची एकाच दिवशीची सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
००००००००००
प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे आवश्यक असून, जिल्ह्यात कोणत्याही गावात अथवा परिसरात कोरोना बाधितांची वाढ होत असल्याचे लक्षात आल्यास तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घ्याव्यात. तेथील लसीकरण वाढवून बाधितांचा शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करावे. खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनी सुद्धा या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले.