वाशिम: कोरोनाबाधितांवर उपचार करतानाच कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाकडून पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) पुरविल्या जात आहेत. तथापि, पूर्वीच्या तुलनेत या किट निकृष्ट असून, उन्हामुळे या किटचा वापर त्रासदायक झाल्याने कोरोना संसर्गाच्या भीतीपेक्षा या किटलाच आरोग्य कर्मचारी वैतागल्याचे दिसत आहे.जिल्हा रुग्णालयासह इतर सर्वच कोरोना रुग्णालये आणि कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी पीपीई किटचा वापर करतात. सुरुवातीच्या काळात या किट दर्जेदार असल्याने त्या वापरताना त्रास होत नव्हता; परंतु आता राज्यस्तरावरून पुरविल्या जाणाऱ्या किट निकृष्ट दर्जाच्या आहेत. सद्यस्थितीत उन्हाचा पारा वाढत असताना ही किट अंगात घालताच पुढच्या पाच मिनिटांत व्यक्ती घामाघूम होऊन जातो. प्लास्टिक स्वरुपाच्या या किट सहा तास अंगात ठेवून कर्तव्य बजावणारे कर्मचारी पुरते वैतागले आहेत. या किटमधून शरीराला हवाच लागत नसल्याने अंगातून घामाच्या धारा निघत असून, बुटातही मोठी घाण साचत आहे. त्यामुळे या किट वापरण्याबाबत कर्मचारी उदासीन दिसत आहेत. काही कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या भीतीपोटी त्यांचे नाव न छापण्याच्या अटीवर पीपीई किटमुळे होणारा त्रास सांगितला; ही किट घालण्यापेक्षा दोन शर्ट आणि दोन पँट, ग्लोव्हज आणि मास्क बरे वाटेल. कोविड केअर सेंटरमध्ये पुरेशी खेळती हवाही नाही. कक्षात रुग्णांची माहिती घेताना ही किट घालून फिरलो तरी घामाने पूर्ण अंग भिजते. -आरोग्य कर्मचारी
गर्मी खूप वाढली आहे. त्यात किट दर्जेदार नाहीत. कोरोनापासून बचाव व्हावा म्हणून हे घालण्याची सक्ती आहे; परंतु आता कोरोना संसर्गाच्या भीतीपेक्षा या किटचाच अधिक वैताग आला आहे. -आरोग्य कर्मचारी
आम्हाला कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पीपीई किट घालाव्या लागतात; परंतु या किटमुळे अधिकच त्रास होत आहे. अंग घामाने भिजल्याने सतत खाज सुटते मग किट काढून टाकावीशी वाटते. यापेक्षा केवळ मास्क आणि ग्लोव्हज बरे राहतील.-आरोग्य कर्मचारी
कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्यांसह कक्षातील व्यक्तींना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पीपीई किट वापराव्या लागतात. या किटचा दर्जा चांगला नसेल, तर वरिष्ठस्तरावर तसे कळवून दर्जा सुधारण्याची मागणी करू. -डॉ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम