वाशिम : शालार्थ प्रणालीअंतर्गत शाळांची बहुतांश कामे ‘आॅनलाईन’ झाली आहेत. त्याची संपूर्ण जबाबदारी मात्र शाळेतील मुख्याध्यापकांच्याच खांद्यावर सोपविण्यात आल्याने दिवसभरातील ‘बिझी शेड्युल्ड’मुळे विद्यार्थ्यांना शिकविणे त्यांच्यासाठी जिकीरीचे ठरत आहे. याशिवाय डोक्यावर सततचा ताण राहत असल्याने त्यांच्यातून दबक्या आवाजात शासनाच्या धोरणाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून शाळांसाठी पाठविला जाणारा पोषण आहार मोजून त्यांचे ‘रेकॉर्ड’ ठेवणे, त्याचा अहवाल शासनाकडे न चुकता वेळेत पाठविणे, विविध स्वरूपातील टपाल स्विकारणे आणि पाठविणे, इंटरनेटवरून विविध संकेतस्थळांवर शाळांची माहिती ‘अपलोड’ करणे यासह जिल्हा कोषागाराकडून थेट मुख्याध्यापकांच्या खात्यात शिक्षकांचा व्यवसायकर, गटविमा, एलआयसी, पतसंस्था कर्ज, बँकांचे कर्ज, सण अग्रीम, गृहकर्ज आदींची रक्कम वळती केली जात असल्याने यासंदर्भातील धनादेश त्या-त्या घटकाकडे सुपूर्द करणे आणि त्याचे ‘रेकॉर्ड’ ठेवणे, दर महिन्याला शिक्षकांचे पगारपत्रक तयार करून ते शालार्थ प्रणालीअंतर्गत ‘अपलोड’ करणे, अशी सर्व कामे मुख्याध्यापकांकडेच सोपविण्यात आलेली आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे जिल्ह्यातील ९० टक्के शाळांमध्ये ‘नेट कनेक्टिव्हिटी’सह इतर तत्सम सुविधांचा अभाव असल्याने आॅनलाईन स्वरूपातील सर्व कामे शहरातील एखाद्या ‘सायबर कॅफे’वर बसून करावी लागतात. यासाठी लागणाºया खर्चाचीही विशेष तरतूद नसल्यामुळे सर्वच शाळांचे मुख्याध्यापक त्रस्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.‘आॅनलाईन’ प्रणाली अंमलात येण्यापूर्वी शिक्षकांच्या पगारीसह इतर सर्व कामे ‘आॅफलाईन’ असताना त्या-त्या तालुक्यांमधील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे होती; परंतू सद्या या सर्व कामांना मुख्याध्यापकांनाच न्याय द्यावा लागत असून त्यांचा बहुतांश वेळ या कामांमध्येच जात आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना शिकविण्याकडेही त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
कुठलाही मुख्याध्यापक हा त्या शाळेचा मुख्य अध्यापक असतो. मात्र, सद्य:स्थितीत सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांना शासनाने अक्षरश: आॅनलाईन कारकून केले असून जास्तीत जास्त कामे त्यांनाच करावी लागत आहे. त्यापेक्षा पुर्वीप्रमाणे पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ही कामे सोपविल्यास मुख्याध्यापकांसोबतच शिक्षकांनाही फायदेशीर ठरेल. यासाठी संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे आवाज उठविला जाईल.- मंचकराव तायडे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना