वाशिम : जिल्ह्यात १० सप्टेंबरपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता रविवार, १९ सप्टेंबर रोजी विसर्जनाने झाली. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने मिरवणुकीविना गणेश विसर्जन शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.
१० सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ‘बाप्पां’चे आगमन झाले होते. यंदाही कोरोना विषाणू संसर्गाचे सावट कायम असल्याने सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या कमालीची घटली. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवरही मर्यादा आल्या होत्या. गेले १० दिवस फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून गणरायांचे मनोभावे पूजन करण्यात आले. १० सप्टेंबर रोजी वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात शांततेत गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायतींतर्फे गणेशमूर्तींचे संकलन करण्याची प्रभागनिहाय विशेष व्यवस्था करण्यात आली होती. संबंधित ठिकाणी भाविकांनी गणेशमूर्ती आणून कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केल्या. त्यानंतर कर्मचाऱ्यांतर्फे गणेशमूर्तींचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले. वाशिम शहरात जवळपास २५ ठिकाणी मूर्ती संकलनासाठी रथाची व्यवस्था होती. त्यामुळे शहरात कुठेही गर्दी झाली नाही तसेच अनुचित प्रकारही घडला नाही. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
....................
यंदाही एकाच टप्प्यात झाले गणेश विसर्जन !
एकाच टप्प्यात सर्वत्र पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करणे शक्य नसल्याने दरवर्षी जिल्ह्यात साधारणत: दोन किंवा तीन टप्प्यांत गणेश विसर्जन होत असते. गतवर्षी कोरोनाचे संकट असल्याने मिरवणुकीवर बंदी होती. यंदादेखील कोरोनाचे सावट असल्याने मिरवणुकीवर बंदी होती. यावर्षीही एकाच टप्प्यात १९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत गणेश विसर्जन झाले.
..........
मुस्लिम बांधवांनी दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
वाशिम येथे बालाजी मंदिरानजीक देव तलावात विसर्जन करण्यात येते. मुस्लिम बांधवांनी मनोभावे बाप्पांचे विसर्जन करीत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. देव तलावाच्या काठावरून मूर्ती फेकून न देता तलावाच्या मध्यभागी ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले.
...................
मानाचा गणपती श्री शिवशंकर गणेशोत्सव मंडळ
वाशिम शहारात मानाचा गणपती श्री शिवशंकर गणेशोत्सव मंडळाचे शांततेत विसर्जन झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गोविंदराव रंगभाळ, उपाध्यक्ष दीपक गाडे व सदस्य प्रमोद टेकाळे, चेतन रंगभाळ, उमेश कथळे, अनंता रंगभाळ, विजय रंगभाळ, योगेश रंगभाळ, बाळासाहेब पवार, भारत धोरण, राहुल काटकर, राम रंगभाळ, अर्जुन रंगभाळ, धर्मेश पटेल, अभी जाधव, आशू रंगभाळ आदी उपस्थित होते.