लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात १० सप्टेंबरपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता रविवार, १९ सप्टेंबर रोजी होत आहे. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने विसर्जन मिरवणुकीवर बंदी असून, गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनांनी भाविकांकडून गणेशमूर्ती संकलन करण्याची प्रभागनिहाय व्यवस्था केली आहे.
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या जयघोषात शांततेत १० सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ‘बाप्पां’चे आगमन झाले. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा फारसा प्रादुर्भाव नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून मिरवणुकीवर बंदी कायम आहे. यंदाही सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या कमालीची घटली तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवरही मर्यादा आल्या. गेले ९ दिवस फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून गणरायांचे मनोभावे पूजन करण्यात आले. काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. १९ सप्टेंबर रोजी गणरायांना निरोप दिला जाणार असून, कोरोनाच्या परिस्थितीत विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून यंदाही नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायतींच्यावतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांकडून गणेशमूर्तींचे संकलन करण्यासाठी स्थानिक प्रशासनांनी प्रभागनिहाय वाहनांची तसेच कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. संबंधित ठिकाणी भाविकांनी गणेशमूर्ती आणून कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द कराव्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले. संकलित केलेल्या गणरायांच्या मूर्तींचे विधिवत विसर्जन प्रशासनातर्फे केले जाणार आहे.
000
गणेश विसर्जनदरम्यान गर्दी होणार नाही याची दक्षता म्हणून त्या-त्या स्थानिक प्रशासनातर्फे गणेशमूर्ती संकलनाची व्यवस्था केली आहे. भाविकांनी नियुक्त चमूकडे गणेशमूर्ती सुपूर्द करून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
- शण्मुगराजन एस., जिल्हाधिकारी, वाशिम
000
गणेश विसर्जनदरम्यान कुठेही गर्दी होणार नाही याची दक्षता म्हणून पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. ड्रोन, व्हिडिओ शूटिंगचीही व्यवस्था केली. १९ सप्टेंबर रोजी एकाच टप्प्यात गणेश विसर्जन होणार आहे. कुणीही मिरवणूक काढू नये.
- वसंत परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम
000
यंदाही एकाच टप्प्यात होणार विसर्जन !
एकाच टप्प्यात सर्वत्र पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करणे शक्य नसल्याने दरवर्षी जिल्ह्यात साधारणत: दोन किंवा तीन टप्प्यांत गणेश विसर्जन होत असते. यंदाही कोरोनाचे सावट कायम असल्याने मिरवणुकीवर बंदी आहे. त्यामुळे वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली. यावर्षी एकाच टप्प्यात १९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे.
00000000000
चोख पोलीस बंदोबस्त
कुठेही अनुचित प्रकार होऊ नये, गर्दी टाळण्यासाठी तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली १ अपर पोलीस अधीक्षक, ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, स्ट्रायकिंग फोर्स , आरसीपी पथक, क्यूआरटी पथक, पोलीस कर्मचारी, होमगार्ड असा बंदोबस्त राहणार आहे. पॉइंट पेट्रोलिंग राहणार आहे.
०००००००