लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात चालू वर्षीच्या पावसाळ्यात कुठे दमदार पाऊस; तर कुठे पूर्णत: उघाड, अशी पावसाची स्थिती असून निसर्गाच्या या अजब खेळापुढे नागरिक हतबल झाले आहेत. दरम्यान, २० जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ २२ टक्के पर्जन्यमान झाले असून नदी-नाले, सिंचन प्रकल्पांसह अन्य जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत कुठलीच वाढ झालेली नाही. वाशिम जिल्ह्यात २० जुलै रोजी सरासरी २.२३ मिलीमिटर पाऊस झाला; मात्र हा पाऊस सहा तालुक्यांपैकी केवळ मंगरूळपीर (५.७९ मिलीमिटर) आणि कारंजा (४.९४ मिलीमिटर) या दोन तालुक्यातच अधिक प्रमाणात असून मानोरा तालुक्यात १.८ मिलीमिटर, वाशिम ०.९, मालेगाव ०.९७ आणि रिसोड तालुक्यात ०.५० मिलीमिटर इतक्या कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली. यातही विशेष म्हणजे ठराविक एकाठिकाणी पाऊस सुरू असताना त्याच्या ४०० ते ५०० मीटरच्या अंतरात पाऊस नसल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. निसर्गाच्या या लहरीपणाचा जबर फटका खरीपातील पिकांना बसण्यासोबतच पाणीटंचाईचा प्रश्न देखील दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. अपेक्षित पर्जन्यमानात १७० मिलीमिटरने घट!वाशिम जिल्ह्यात १ जून ते २० जुलै या कालावधीत सरासरी ३३० मिलीमिटर पाऊस कोसळणे अपेक्षित असते. यावर्षी मात्र त्यात तब्बल १७० मिलीमिटरने घट झाली असून २० जुलै २०१९ पर्यंत केवळ १६० मिलीमिटर पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी जेमतेम २२.५४ आहे.
वाशिम जिल्ह्यात कुठे दमदार पाऊस; तर कुठे पूर्णत: उघाड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 4:22 PM