वाशिम: पावसाने जिल्ह्यात पुन्हा धडाका सुरू केला आहे. रविवार ११ सप्टेंबर ते सोमवार १२ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात ३८.४० मि.मी पावसाची नोंद झाली असून, सहा महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला असून, नदी, नाल्यांनाही पूर आल्याने अनेक भागांत पिकांसह जमिनी खरडून गेल्या आहेत.
जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७८९.०० मि.मी. पाऊस अपेक्षीत असताना १२ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजेपर्यंतच ७९८.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात रविवार ११ सप्टेंबर ते सोमवार १२ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी ३८.४० मि.मी. पाऊस पडला. मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यात या २४ तासांत धो-धो पाऊस पडल्याने सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यात मंगरुळपीर तालुक्यातील पोटी, कवठळ, मानोरा तालुक्यातील इंझोरी आणि कारंजा तालुक्यातील धनज बु. आणि उंबर्डा बाजार महसूल मंडळाचा समावेश असून, अतिवृष्टीमुळे या मंडळात नदी. नाल्या काठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकांसह जमिनी खरडून गेल्या आहेत.इंझोरी मंडळात २४ तासांत १३५ मि.मी. पाऊसजिल्ह्यात रविवारी रात्रीपासून पावसाने धडाका सुरू केला. सोमवारीही पावसाचा धडाका सुरूच होता. या पावसामुळे इंझोरी महसूल मंडळात २४ तासांत १३५.०० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याशिवाय मंगरुळपीर तालुक्यातील पोटी मंडळात ८८.००. कवठळ मंडळात ७७.८०, कारंजा तालुक्यातील धनज बु. मंडळात ८१.३० आणि उंबर्डा बाजार महसूल मंडळात ७९.५० मि.मी. पावसाची नोंद झाली.हातातोंंडाशी आलेली पिके नेस्तनाबूदजिल्ह्यात रविवार सकाळ ते सोमवार सकाळपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ३८.४० मि.मी. पावसाची नोंद झाली असली तरी मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील बहुतांश मंडळात ५० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके नेस्तनाबूद झाली असून, या पीक नुकसानाची तातडीने पाहणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.धनज बु ते कारंजा रोडवरील वाहतूक ठप्पजिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. त्यात कारंजा तालुक्यातील धनज बु ते कारंजा मार्गावरील झोडगा नदीला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास तीन तास ठप्प झाली होती. सोमवारी दुपारपर्यंतही या नदीचा पूर ओसरला नव्हता. अडाण नदीचे पात्रही दुथडी भरून वाहत होते.