तालुक्यातील १४ गावांत ढगफुटीसदृश पाऊस बरसला. यात कुंभी येथील पाझर तलाव फुटला, तर पिंपळगाव परिसरातील शेततळे फुटले आणि भोपळपेंडा नदीच्या पात्राला पूर आला आणि परिसरात १५० हेक्टरचे पीक खरडून गेले. तालुक्यातील पिंपळगाव, कुंभी, वसंतवाडी, लही, पिंपळगाव, आसेगाव, नांदगाव, चिंचोली, चिंचखेडा, शिवणी, दाभडी, रामगड, भडकुंभा, सनगाव, तसेच तालुक्यातील इतर गावांनासुद्धा पुरासह अति पावसाचा फटका बसला. विशेषत: चेक डॅम फुटून कुंभी शिवारात नुकसान झाले. जमिनीवरचा खडक तितकाच शिल्लक राहिला आहे. इतर शेतशिवारात पाणी शिरल्याने या भागातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील पिंपळगाव परिसरात १४, २० व २१ जुलैला रात्री जोरदार पाऊस झाला. पिंपळगाव परिसरात शेततळे फुटले. यात खालील परिसरातील पीक वाहून गेले, तर कुंभी शिवारातील चेक डॅम फुटला. पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की, जमिनीवरचा मातीचा थर खरडून गेला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागांत पाणी साचले आहे. काही ठिकाणी पिके मुळासह वाहून गेली आहेत, तर सावरगाव (कान्होबा) येथील पुराचे पाणी बाजूच्या चिखलागड व इतर गावांत शेतात घुसल्याने पिकांचे नुकसान होऊन जमीन खरडून गेली. यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे, तर शिवणी, गणेशपूरसह अनेक नद्या पावसामुळे दुथळी भरून वाहत होत्या. या विषयाचे निवेदन ता. २२ रोजी तहसीलदारांना देण्यात आले आहे. या वेळेस माजी पं.स. सभापती प्रतिभाताई महल्ले यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. यावेळी अंबादास टोपले, गणेश टोपले, रंगनाथ राजूरकर, गोपाल टोपले, गजानन उत्तरवार, किसन हिंगणकर, विजय डुकरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
अतिवृष्टीचा मंगरूळपीर तालुक्याला मोठा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:24 AM