लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदाच्या खरीप हंगामात निसर्गाचे दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवित आहे. पावसाचा खंड, निकृ ष्ट बियाण्यांचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसला असतानाच जिल्ह्यात २२ जुलैपासून हजेरी लावलेल्या पावसाने अनेक भागांत तांडव करून पिकांसह शेतजमिनीचे नुकसान केले आहे. कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यातील मिळू ५०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतजमिनींचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. या नुकसानाच्या पंचनाम्यास मात्र विलंब होत असल्याने शेतकरी व्यथीत आहेत.जिल्ह्यात यंदाच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकºयांना बसत आहे. त्यात पाच जूनपासून पावसाने दडी मारली, तर १० जूनला काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, तर बहुतांश भागांत १४ जूनपर्यंत पाऊस पडला नाही. शिवाय २२ जूननंतर पावसाने अनेक भागांत ठाणच मांडले. याच कालावधित कारंजा तालुक्यातील धनज बु., रिसोड तालुक्यातील मोप, भर जहॉगिर परिसरात अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याने खरडल्या. वाशिम तालुक्यात दगड उमरा शिवारात अतिवृष्टीमुळे तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शेतांत पाणी घुसले, तर मालेगाव तालुक्यातील मेडशी परिसरात २८ जून रोजी पावसाने थैमान घालून शेतजमिनीचे नुकसान केले. त्यानंतर २ जुलै रोजी रात्री दोन तास पाऊस मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी घुसून पिकांसह शतजमिनी खरडून गेल्या. त्यात २८ जून रोजी आलेल्या मुसळधार पावसानंतर संबंधित तलाठ्यांनी मेडशी भाग १ आणि मेडशी भाग २ या शिवारात या नुकसानाची पाहणी केली. त्यात जवळपास २० हेक्टर क्षेत्रातील जमिनी बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल त्यांनी तयार केला आहे. रिसोड तालुक्यातील मोप मंडळातही गत आठवड्यात जोरदार पाऊस पडला. त्यात नदी, नाल्या काठी असलेल्या बोरखेडी, पिंपरखेड, कन्हेरी, मोप, आसोला या पाच गावांत पावसाचे पाणी घुसल्याने शेकडो एकर शेतजमीनबाधित झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीचे पंचनामेच अद्याप पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे उपरोक्त पाच गावांत नेमके किती क्षेत्र बाधित झाले हे कळणे अशक्य आहे. आता तलाठ्यांकडून प्राप्त पंचनाम्याची पडताळणी करून शासनाकडे अहवाल सादर होण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांना या नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकºयांकडून उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
५०० एकरहून अधिक क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 11:26 AM