वाशिम : कारंजा तालुक्यातील उकर्डा, पानगव्हाण, काजळेश्वर, पलाना परिसरात १९ जुलै रोजी मुसळधारा कोसळल्याने उमा नदीचे पात्र दुथडी भरून वाहते झाले. नदी-नाले एक झाल्याने नदीकाठच्या परिसर जलमय झाला.
यंदा मान्सून लांबल्याने पेरण्याला प्रचंड विलंब झाला. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अधून-मधून कारंजा तालुक्यात दमदार पाऊस पडत आहे. १९ जुलै रोजी पहाटेपासूनच काजळेश्वर परिसरात मुसळधारा कोसळल्या. यामुळे उमा नदी व नाले एकत्र झाल्याने नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेतात पाणीच पाणी असल्याचे दिसून येते. यामुळे पिके पाण्याखाली गेली असून, काही शेतकऱ्यांची शेतीही खरडून गेली, बांध-बंधारे फुटल्याने प्रचंड नुकसान झाले.
शासन, प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी काजळेश्वर किसान ब्रिगेडचे प्रमूख नितीन पा. उपाध्ये, तैसीमभाई, संतोष उपाध्ये, उकर्डा येथील संतोष महाजन, पानगव्हान येथील गोलू शिंदे,जानोरी येथील अवि भींगारे, पलाना येथील सरपंच पवन गोपकर, उपसरपंच संतोष मुसळे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली.
उमा नदी तसेच नाल्यांना आलेल्या पुरामुळे काजळेश्वर परिसरात जलमय परिस्थितीबाबत माहिती मिळताच तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीबाबत सूचना दिल्या असून, उपविभागीय अधिकाऱ्यांसमवेत स्वत: पाहणी दौरा करणार असल्याचे कारंजाचे तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी सांगितले.