लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सर्वदूर ९ जूनच्या पहाटे तीन वाजेपासून दमदार पावसाने हजेरी लावली. तीव्र स्वरूपात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत झालेल्या या पावसाची तब्बल १४३ मिलीमीटर नोंद घेण्यात आली. दुपारच्या सुमारासही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त असून, खरिपातील पिकांच्या पेरणीची कामे यामुळे सुरू होणार असल्याची शक्यता शेतकर्यांमधून वर्तविली जात आहे. यंदा तुलनेने अधिक पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामन खात्याने वर्तविला असून, मान्सूनपूर्व तसेच मान्सून लागल्यानंतर त्याची अनुभूतीदेखील येत आहे. ९ जूनच्या पहाटे तीन वाजे पासून दमदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस पहाटे पाच वाजेपर्यंत सलग सुरू होता. या पावसाची वाशिम तालुक्यात २३ मिलीमीटर, मालेगावमध्ये १५, मंगरूळपीर २५ आणि मानोरा तालु क्यात सर्वाधिक ८0 मिलीमीटरची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यातील मानोरा, मेडशी, राजुरा यासह इतर अनेक गावांमध्ये ९ जूनला दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. यामुळे नदी-नाले वाहते झाले असून, जलस्रोतांच्या पाणी पातळीत बहुतांशी वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाशिम जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; १४३ मिलीमीटरची नोंद
By admin | Published: June 10, 2017 2:17 AM