वाशिम - पीक कर्जासाठी अर्ज करताना संबंधित कर्जदाराला आपल्या सर्व वारसदारांना संबंधित बँकेत स्वाक्षरीसाठी घेऊन जाण्याची वेळ आली आहे. वारसदारांमध्ये वाद निर्माण होवू नये यासाठी यावर्षीपासून पीककर्ज अर्जावर सर्वच वारसदारांची स्वाक्षरी आवश्यक केली आहे.
वाशिम जिल्ह्यात दोन दिवस मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पीककर्ज काढून बी-बियाणे, खतांची खरेदी, पेरणीची पूर्वतयारी करण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येते. शेतकºयांना तातडीने पीककर्ज देण्याच्या सूचना शासनस्तरावरून जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनानेदेखील पीककर्ज वाटप प्रक्रिया सुलभ करण्याच्या सूचना बँक प्रशासनाला दिलेल्या आहेत. पीक कर्जाविषयी आवश्यक कागदपत्रांची यादी सर्व बँकांच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचनाही प्रत्येक जिल्हाधिकाºयांनी बँकांना दिलेल्या आहेत. आता कर्जदाराच्या सर्व वारसदारांच्या स्वाक्षºया कर्ज मागणी अर्जावर घेतल्या जात आहेत. गतवर्षी मालेगाव व वाशिम तालुक्यात कर्ज वाटप प्रक्रियेवर वारसदारांनी आक्षेप घेतल्याने, संभाव्य वाद टाळण्यासाठी सर्वच वारसदारांच्या स्वाक्षरी घेतल्या जात आहेत, असे बँक प्रशासनाने सांगितले. कर्जदाराची मुले, मुली १८ वर्षाखालील असली तरी कर्ज अर्जावर स्वाक्षरी घेण्यासाठी या वारसदारांनाही स्वाक्षरीसाठी बँकेत जाण्याची वेळ आली आहे. पीककर्ज वाटपासाठी यावर्षी वाशिम जिल्ह्यात १४७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. कर्जप्रकरणी वारसदारांमध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी सर्व वारसदारांची अर्जावर स्वाक्षरी घेणे काही बाबतीत योग्य असले तरी वारसदार १८ वर्षाखालील असतील तर त्यांना केवळ स्वाक्षरीसाठी बँकेत बोलाविणे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया शेतकºयांमधून उमटत आहेत.