वाशिम/रिसोड : दुचाकीवर दोन व्यक्तींना परवानगी देतानाच, हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची १ आॅगस्टपासून जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने ३१ जुलै रोजी दिलेल्या आहेत. तथापि, या सुचनांकडे दुर्लक्ष करीत वाहनधारक विना हेल्मेट वाहने चालवित असल्याचे १७ आॅगस्ट रोजी रिसोड, मालेगाव, वाशिमसह प्रत्येक शहरात दिसून आले.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये दुचाकीवर एकाच व्यक्तीला परवानगी होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वाहतूक नियमात शिथिलता देत १ आॅगस्टपासून दुचाकीवर दोघांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली. यासोबतच हेल्मेटचा वापर करणे सक्तीचे करण्यात आले. हेल्मेट न वापरल्यास संबंधित वाहनधारकाविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. १६ दिवसानंतरही या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे १७ आॅगस्ट रोजी रिसोड, वाशिम यासह प्रमुख सहाही शहरांमध्ये दिसून आले. रिसोड येथे प्रमुख चौकातूनही विना हेल्मेटचा प्रवास सुरू असल्याचे दिसून आले.(प्रतिनिधी)
वाशिम जिल्ह्यात ‘हेल्मेट सक्ती’ कागदावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 11:46 AM