समाजसेवेचे कार्य करणाऱ्या कारंजा व मानोरा तालुक्यातील काही युवक मंडळींनी मिळून एक उब जाणिवेची ही संघटना सुरू केली आहे. ही संघटना अठरा विश्व दारिद्र्यात जीवन जगत असलेल्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्याचे काम गेल्या काही वर्षापासून अखंडपणे करीत आहेत. त्यात उंबर्डा बाजार येथील इंदिरा नगर झोपडपट्टी भागात राहणारे ६५ वर्षीय किसना हजारे, त्यांची ८० वर्षीय म्हातारी आई, तथा पाच वर्षे वयाची नात व सात वर्षे वयाचा नातू एका चंद्रमौळी झोपडीत राहतात. त्यांचे पावसाळ्याच्या दिवसात मोठे हाल सुरू असल्याची माहिती एक उब जाणिवेची संघटनेच्या सदस्यांना मिळाली. त्या अनुषंगाने २१ जुलै रोजी या संघटनेच्या सदस्यांनी इंदिरा नगर झोपडपट्टीतील किसना हजारे यांच्या झोपडीचा शोध घेऊन त्यांना महिनाभर पुरेल अशा २५ जीवनावश्यक वस्तूंसह रेशन तथा दैनंदिन वापराचे कपड्यांचे वाटप करीत सामाजिक दायित्व पार पाडले.
.............
दर महिन्याला करणार मदत
एक उब जाणिवेची या संघटनेने किसना हजारे यांचे कुटुंब दत्तक घेऊन त्यांना दर महिन्याला लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंसह रेशन देणार आहे. सध्या झोपडीत पाणी साचत असल्याने लवकरच निवाऱ्यासाठी टिनशेड सुध्दा उभारून देणार असल्याची माहिती संघटनेच्या सदस्यांनी दिली. एक उब जाणिवेची या संघटनेच्या माध्यमातून शासकीय योजनांपासून शैकडो मैल दूर अठरा विश्व दारिद्र्यात हलाखीचे जीवन जगत असलेल्या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांना ग्रुपच्या सहकार्याने प्रत्यक्ष मदत करण्याच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.